लोकमत न्यूज नेटवर्क वाळपई: सत्तरी तालुक्यात पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र जाहीर झाल्यास विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहेत. अभयारण्याची अधिसूचना जाहीर होऊन २४ वर्षे उलटली आहेत. ती रद्द करण्याची वारंवार मागणी केली जाते. मात्र ती अद्याप रद्द झालेली नाही. अभयारण्य क्षेत्र झाल्यास जनतेच्या उदरनिर्वाहावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे याला कोणत्याही परिस्थितीत मंजुरी देऊ नये अशी जोरदार मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी केली. संवेदनाशील समितीच्यावतीने क्षेत्र अभ्यास वाळपई नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सभा झाली.
यावेळी उपस्थितांनी अभयारण्य क्षेत्र झाल्यास होणारे परिणाम मांडत जनतेला आज अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यात दुप्पट वाढ होईल अशी भीती व्यक्त केली. सत्तरी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र मान्य झाल्यास त्याचे गंभीर परिणाम जनतेच्या उदरनिर्वाहावर होणार आहेत असे सांगण्यात आले. यावेळी प्रत्येकाने या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. विकासावर कोणत्या प्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात याची माहिती दिली. आमदार डॉ. दिव्या राणे, समितीचे अध्यक्ष डॉ. सुजय कुमार, डॉ. एस. सी गारगोटी, डॉ. हितेंद्र पडियाला, डॉ. रितेश जोशी, डब्लू, भारतसिंग, आर. पी. सिंग, पी. के. गाजभैया, डॉ. एस. केरकट्टी, डॉ. सुकुमार सिंग यांची उपस्थिती होती.
समितीचे अध्यक्ष डॉ. सुजय कुमार यांनी सांगितले की भावी पिढीसाठी पर्यावरणाची जतन होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अन्यथा भावी पिढीला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर विकाससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचे रक्षण व विकासाची गती तीव्रतेने पुढे गेली पाहिजे. सत्तरी तालुक्यातील जनतेने संवेदनशील क्षेत्राला केलेल्या विरोधाची निश्चितच दखल घेण्यात येईल.
आमदार दिव्या राणे यांनी सांगितले की, सत्तरी तालुका पूर्णपणे जंगलाने वेढलेला आहे. शेकडो वर्षापासून तालुक्यातील जनता या जंगलांमधील अनेक घटकांच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करते. यावर आघात झाल्यास उदरनिर्वाहावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. निसर्गाचे रक्षण जरूर करण्यात येईल. मात्र विकासावर त्याचे आघात होणार नाहीत याची दक्षता घ्या' असे सांगत त्यांनी संवेदनशील क्षेत्र म्हणून मंजुरी देण्यात येऊ नये याचा पुनरुच्चार केला.
सुरुवातीला उदय सावंत यांनी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर व विकासावर काय परिणाम होऊ शकतात याची माहिती दिली. भूमीपूत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस यांनी तालुक्यातील जनता कशा प्रकारे हाल सहन करत आहे ते सांगितले. अभयारण्याची अधिसूचना मंजूर झाल्यास तालुक्यातील जनता पेटून उठणार असा इशारा दिला.
सरपंच उदयसिंग राणे यांनी, विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टी या सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा दिला. बी. डी. मोटे यांनी तालुक्याच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली. उदय सावंत यांनी सूत्रसंचालन केले.