लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :लोकमत मीडियातर्फे आयोजित बहुप्रतीक्षित गोवन ऑफ द इयर अॅवॉर्डस २०२४' हा सोहळा आज २८ फेब्रुवारी रोजी प्रमुख पाहुणे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत कांपाल-पणजी येथील हॉटेल गोवा मेरियटमध्ये होणार आहे.
गोवन ऑफ द इयर' हा पुरस्कार गोव्यातील नामवंत उद्योजक अनिल खंवटे यांना देण्यात येणार आहे. त्याशिवाय बेस्ट लेजिस्लेटर म्हणून युरी आलेमांत तर एमर्निंग पॉलिटिशिअन म्हणून डॉ. दिव्या राणे यांचा गौरव केला जाणार आहे. वरिष्ठ कार्यक्षम आयपीएस अधिकारी म्हणून जसपाल सिंग, आयएएस अधिकारी म्हणून प्रसाद लौलयेकर यांनाही गौरविण्यात येणार आहे. नोटवर्थी कॉट्रिब्युशन इन जर्नलिझम यासाठी दिला जाणारा पुरस्कार हेराल्ड पब्लिकेशनचे मालक संपादक राउल फर्नाडिस यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सदानंद शेट तानावडे, कॉंग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, विरोधी पक्षनेते पुरी आलेमांव, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि उद्योगमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित राहाणार आहेत. लोकमत मिडियाचे चेअरमन डॉ विजय दर्डा हे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील.
सोहळ्यात पोलिस खाते, प्रशासन, आरोग्य, पर्यावरण, फलोत्पादन, क्रीडा, कला व संस्कृती या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान गोमंतकीयांना पुरस्कार दिले जाणार आहेत. गोवा सरकारचे माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि पर्यटन विभागाचे सहकार्य या सोहळ्याला लाभले आहे.
'गोवा व्हिजन २०५० वर चर्चासत्राचे आयोजन
सोहळ्यात सुरुवातीलाच गोवा व्हिजन २०५० हे चर्चासत्र होणार आहे. त्यात उद्योगपती श्रीनिवास धेपो, शेखर सरदेसाई, शांतनू शेवडे, शांताकुमार यांच्यासह मॉडरेटर म्हणून नितीन कुकळयेकर सहभागी होणार आहेत, या चर्चेत गोवा २०५० साली कुठे असेल आणि तो अधिक चांगला बनविण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासंबंधीची मते गोव्यातील आघाडीचे उद्योगपती व्यक्त करणार आहेत.