पणजी : देशातील प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेद इस्पितळ होणार आहे. मंजूर केलेल्या ११८ आयुर्वेद इस्पितळांपैकी १०० इस्पितळांचे काम चालू असून, तीन वर्षांत सर्व पूर्ण होतील. योग या विषयाला आयुष मंत्रालय प्राधान्य देत असून तीन महिने ते सहा वर्षे कालावधीचे पदवी, पदव्युत्तरपर्यंतचे अभ्यासक्रम आणले जातील. देशभरात १२,५०० वेलनेस सेंटर्स येतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
नाईक यांनी योगदिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’च्या पणजी कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी वार्तालापात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, ‘कोरोनाच्या बाबतीत जगाला योगासनांचा फायदाच झाला. ‘योग’ कोविडवर प्रभावीच हे सिद्ध झाले आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हा बिनखर्चाचा उपाय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे जगाला हे उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले. भारतापेक्षा अन्य देशांमध्ये योगासनांचा जास्त प्रसार होत आहे.
शास्रीय प्रमाणीकरण मिळविणार
नाईक म्हणाले की, कोविडवर आयुर्वेदिक उपचाराला शास्रीय मान्यता मिळविण्यासाठी कृती दल स्थापन करण्यात आले आहे. आयुर्वेदिक तसेच पारंपरिक औषधोपचार फॉर्म्युल्यांना आयसीएमआरसारख्या संशोधन संस्थेकडून प्रमाणीकरण मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. दिल्ली पोलिसांना कोविडवर मात करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेतले.
दोडामार्गला ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिसिनल प्लांट’
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिसिनल प्लांट’ संस्था प्रकल्प अन्य कुठल्या तरी राज्यात गेला असता. परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी मी बोललो आणि हा प्रकल्प आता गोवा-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या दोडामार्ग येथे येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
नाईक म्हणाले की, ‘रत्नागिरी, सिंधुदुर्गला आयुर्वेदिक इस्पितळे येणार आहेत, नवी मुंबईतही संशोधन केंद्र येणार आहे. ‘मिक्सोपॅथी’च्या विषयावर विचारले असता नाईक म्हणाले की, अॅलोपॅथी आणि आयुर्वेद किंवा होमियोपॅथीबाबतीत शास्त्रीय संशोधनाची पद्धत वेगळी आहे. आयुर्वेदसाठी जागतिक दर्जाची प्रयोगशाळा हवी.