लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'भारत स्वाभिमान'च्या वतीने शनिवारपासून (दि. १८) मिरामार समुद्रकिनाऱ्यावर योगगुरू बाबा रामदेव यांचे निःशुल्क योग शिबिर होणार आहे. तीन दिवस होणाऱ्या या शिबिराला योगगुरू बाबा रामदेव यांची उपस्थिती लाभणार आहे.
शनिवारी, महाशिवरात्रीच्या दिवशी शिबिराची सुरुवात होणार आहे. सकाळी ५ ते ७:३० असा योगासन वर्ग असेल. यावेळी महाशिवरात्रीचा शिवजलाभिषेक व शिवपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. ओडिशा येथील विश्वविख्यात वाळू शिल्पकार मानस साहू हे शिवपिंडीचा देखावा साकारणार आहेत. येथे १२ शिवपिंडी बनविल्या जातील. जलाभिषेकाचा कार्यक्रम तपोभूमीच्या पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सर्वांना शिवपिंडीवर जलाभिषेकाची संधी मिळणार आहे, अशी माहिती पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रभारी परमाकर महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिबिराच्या पहिल्या दिवशी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले. शेवटच्या दिवशी, म्हणजेच २० रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत लहान मुला-मुलींसाठी बाबा रामदेव यांच्या विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व प्राथमिक ते उच्च प्राथमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी, असे परिपत्रकही शिक्षण खात्याने जारी केले आहे.
गोवा सरकारच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ते लोकांसाठी निःशुल्क असून, सकाळी ५ वाजता सुरू होणाऱ्या या राहावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला पतंजली योगपीठाचे गोवा प्रभारी कमलेश बांदेकर, पतंजली पीठाचे पदाधिकारी विश्वनाथ कोरगावकर, सनी सिंग आणि गिरीश परुळेकर हे उपस्थित होते.
कैलास खेर यांचे शिवभजन
महाशिवरात्रीच्या दिवशीच संध्याकाळी ७:३० ते रात्री १० या वेळेत विख्यात गायक कैलास खेर व त्यांच्या कैलास बँडतर्फे शिवभजनाचा कार्यक्रम सादर केला जाईल
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"