पणजी - मगो पक्षाचे दोन आमदार पक्षापासून विभक्त झाल्यासारखी स्थिती आहे. बाबू आजगावकर व दिपक प्रभू पाऊसकर हे पक्षापासून वेगळे होऊन आपला गट भाजपामध्ये विलीन करतील अशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपामध्येही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे दिल्लीत आहेत. ते तिथे भाजपाच्या काही केंद्रीय नेत्यांना भेटले आहेत. मगो पक्ष विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी शिरोडा मतदारसंघातून भाजपाविरुद्ध लढत असल्याने भाजपाने नवी चाल खेळली आहे. सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात ठेवायचे काही नाही याचा निर्णय भाजपानंतर घेईल पण तूर्त मगोपच्या दोन आमदारांना पक्षापासून विलग केले जाईल. मगोपचे दोन्ही आमदार गेले काही दिवस अस्वस्थ आहेत. मगोपचे सावर्डेचे आमदार दिपक प्रभू पाऊसकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. मगोपच्या तिन्ही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशा प्रकारचा ठराव मगो पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र तो ठराव ढवळीकर यांनी भाजपाचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांच्याकडे पोहचविला नाही. यामुळे पाऊसकर व आजगावकर नाराज झाले. मगो पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी शिरोडा मतदारसंघात भाजपाविरुद्ध लढू नये असेही आजगावकर यांना वाटते. त्यांनी तसे यापूर्वी सुदिन ढवळीकर यांना सांगितले असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
मगोपच्या दोन आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करावा व त्यांनी तसे उपसभापती मायकल लोबो यांना कळवावे असे ठरले आहे. मात्र लोबो सध्या विदेश दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे तात्पुरते हंगामी सभापती नेमून फुटीचे सोपस्कार पार पाडावेत काय याविषयी भाजपामध्ये खल सुरू आहे.