पणजी: ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला गुरुवारी पहिले पदक प्राप्त झाले आहे. गोव्याच्या बाबू अर्जुन गांवकर याने मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळात पुरुषांच्या लेझर रन प्रकारात सुवर्ण पदक मिळवीत पदक तलिकेचा शुभारंभ केला. बाबू गांवकर याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पदक मिळवून स्वतःलाच वाढदिवसाचे अविस्मरणीय गिफ्ट दिले आहे.
सदर स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात झाली. लेझर रन प्रकारात ६०० मीटर धावणे व शूटिंग यांचा समावेश होता. या दोन्ही गोष्टी सांभाळून नेत्रावळी-सांगे येथील रहिवासी असलेला २२ वर्षीय बाबू गावकर याने हे यश मिळविले आहे. बाबुचे वडील हे मेकॅनिक आहे. कठीण परिस्थितीत बाबू याने धावण्याचा आणि शूटिंगचा सराव करत हे पदक मिळविल्यामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.
बाबू याची ही पहिलीच प्रमुख मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा आहे. यापूर्वी त्याने महाविद्यालयीन स्तरावर मॅरेथॉन, मिनी मॅरेथॉनमध्ये भाग घेत पदके मिळविली होती. बाबूने आपल्या या यशाचे श्रेय आपले आई वडील व प्रशिक्षक निलेश नाईक याला दिले.
फळदेसाई कुटुंबियांकडून कडून बाबुला १ लाख रुपये जाहीर (चौकट करणे) सांगेचे आमदार तथा समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आपल्या कुटुंबाकडून बाबू गांवकर याला गोव्याला सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल १ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या गोमंतकीय खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यातून त्याला व इतर खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असे फळदेसाई यांनी सांगितले. क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी बाबुचे अभिनंदन केले.