लोकमत न्यूज नेटवर्क, सासष्टी : भारतीय जनता पक्षातील एका गटाने कायम बाबू कवळेकर यांच्याशी शह-काटशहचे राजकारण खेळले आहे, अशी कवळेकर यांच्या केप्यातील कार्यकर्त्यांची भावना झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी बाबू कवळेकर यांच्या नावाचा विचार भाजप वर्तुळात सुरू होता. पण कवळेकर यांचा पत्ता कट होईल, याची खबरदारी काहीजणांनी घेतली, अशी कवळेकर यांच्या समर्थकांची व कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. कवळेकर यांचा विश्वासघात झाला अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
दरम्यान, बाबू कवळेकर हे गेले दोन महिने भाजपच्या सर्व मंत्री, आमदार व नेत्यांच्या संपर्कात होते. काहीजणांच्या घरीही जाऊन त्यांनी आपली भूमिका मांडली होती. आपण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे कवळेकर सांगत होते. मात्र, काही मंत्री, आमदार व अन्य नेते कवळेकर यांचे तोंडावर स्वागत करायचे, पण प्रत्यक्षात रणनीती उघड करत नव्हते. कवळेकर हे भाजपच्या संसदीय मंडळाच्या दिल्लीतील बैठकीवेळी दोन-तीन दिवस दिल्लीतच होते.
कवळेकर हे संपूर्ण दक्षिण गोव्यात फिरून आपला प्रचार करत राहिले. तिकीट मिळाले तर आपण कमी पडू नये, अशी त्यामागे भावना होती. विधानसभा निवडणुकीवेळी केप्यात पराभव झाला. त्यावेळी भाजपच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी कवळेकर यांना मते दिली नाहीत, असे समोर आले. तुम्ही कवळेकर यांना मत देऊ नका, असा संदेश त्यावेळी कुणी त्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिला होता, याची माहिती कवळेकर यांच्याकडे आहे असे कळते. कवळेकर यांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा है होऊच नये, अशी धडपड भाजपमधील एक गट करत आहे.
कवळेकर यांना भाजपने तिकीट देऊ नये म्हणून गोव्याहून एक गट सक्रिय झाला. त्या गटाने दिल्लीतील नेत्यांना वेगळी माहिती दिली व मग कवळेकर यांचा पत्ता कट झाला, अशी चर्चा केप्यात कालपासून सुरू झाली आहे. अर्थात भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी मात्र कवळेकर यांना पाठिंबा दिला होता.
बाबू प्रचंड दुखावले
मीडियाने बाबू कवळेकर यांना काल प्रतिक्रिया विचारली पण कवळेकर यांनी मनातील दुःख लपवून ठेवले. हे दुःख त्यांनी आपल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना सांगितले. आपला काहीजणांनी छुप्या पद्धतीने पत्ता कट केल्याची माहिती आपल्याकडे आहे, असे कवळेकर त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. आता बाबूंचा केसाने गळा कापणारे हे महाभाग कोण याचा शोध काही कार्यकर्ते घेत असल्याची माहिती मिळाली. बाबूंच्या पत्नी सावित्री कवळेकर व बाबू कवळेकर या दोघांनाही राजकीयदृष्ट्या नेस्तनाबूत करण्याची चाल खेळली जात आहे हे सर्व कार्यकर्त्यांना कळाले आहे. मध्यंतरी काहीजण मुद्दाम एल्टन डिकॉस्टा यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते हेही अनेकांना ठाऊक आहे.