पणजी : गोवा फॉरवर्ड पक्षात केवळ दीड-दोन वर्षापूर्वी पाहुणो बनून आलेले माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नव्या सोयीच्या भूमिकेनुसार अखेर शुक्रवारी फॉरवर्डला रामराम ठोकला आहे. आपण फॉरवर्ड सोडत असून पणजीतून पोटनिवडणूक अपक्ष लढवत आहे, असे मोन्सेरात यांनी जाहीर केले.
मोन्सेरात हे सातत्याने पक्ष बदलत आले आहेत. 2017 साली मनोहर र्पीकर यांच्याविरोधात आपण पणजीतून पोटनिवडणूक लढवीन, असे मोन्सेरात यांनी जाहीर केल्यानंतर गोवा फॉरवर्डने समेट घडविण्याची भूमिका घेतली व त्यावेळी फॉरवर्डच्या नेत्यांनी बाबूशला आपल्या पक्षात आणले. मोन्सेरात हे फॉरवर्डमध्ये राहणार नाहीत हे अपेक्षित होतेच. तथापि, त्यांना फॉरवर्डमध्ये उपाध्यक्षही बनविले गेले. फॉरवर्ड हा भाजपप्रणीत आघाडीचा भाग आहे. पणजी हा भाजपचा गेली 25 वर्षे बालेकिल्ला बनून राहिला असून त्या बालेकिल्ल्यात आपण अपक्ष लढेन, असे मोन्सेरात यांनी जाहीर केल्याने ते फॉरवर्डमध्ये राहण्याचा आता प्रश्न येत नाही. भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांच्याविरोधात मोन्सेरात हे एक निवडणूक हरलेले आहेत. मोन्सेरात यांनी फॉरवर्डला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेऊन योग्य केले, कारण आम्ही आघाडीमध्ये असल्याने भाजपविरोधात लढू शकत नाही, असे फॉरवर्डच्या एका नेत्याने सांगितले. मगोपसारखी स्थिती फॉरवर्डच्या वाटय़ाला येऊ नये असाही विचार मोन्सेरात यांनी केला.
पीडीए हातातून जाणार
दरम्यान, मोन्सेरात यांना बक्षीस म्हणून स्व. मनोहर पर्रीकर यांनी ग्रेटर पणजी ही नवी पीडीए स्थापन करून दिली होती. त्या पीडीएचे चेअरमनपद मोन्सेरात यांना दिले गेले होते. त्या पीडीएकडून ताळगावचा ओडीपी वगैरे नुकताच तयार करण्यात आला. मोन्सेरात आता पणजीत लढू पाहत असल्याने त्यांची ग्रेटर पणजी पीडीएच्या चेअरमनपदावरून सरकार उचलबांगडी करणार आहे. तत्पूर्वीच ते स्वत: पीडीए सोडतील काय हे कळू शकले नाही.