लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराची हालत झाली आहे. मात्र पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांना केवळ बाह्य विकास आराखडा (ओडीपी) व रियल इस्टेटमध्येच रस आहे. शहराचे त्यांना काहीच पडून गेले नसल्याचा आरोप उत्पल पर्रीकर यांनी केला.
आमदार या नात्याने बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेत पणजीविषयी एकही प्रश्न का मांडला नाही. निवडणुकाजवळ येताच पणजीतील रस्त्यांवर डांबराचा थर घातला जातो. त्यानंतर व्हिवा बाबूश अशा घोषणा दिल्या जातात. मात्र सहा महिन्यात हे डांबर वाहून जाते. पुस्तकांवरील कव्हर सुद्धा जास्त दिवस टिकते. पण पणजीतील रस्त्यांवरील डांबर टिकत नाही, अशी टीका त्यांनी केली.
पर्रीकर म्हणाले, की शहरातील रस्त्यांवरील डांबर वाहून गेले आहे. चेंबर आले वर आहेत, मल:निस्सारणाचे काम कधी पूर्ण होणार, याची शाश्वती नाही. मार्केट गळत आहे, स्मार्ट सिटीची कामे कधी पूर्ण होणार याचा कुठलाही थांगपत्ता नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पैसा खर्च झाला खरा, परंतु अपेक्षित काम झाले नाही. उलट ज्या सुविधा उभारल्या त्यांचा दर्जा खालावला जा आहे. आहे. त्यामुळे इतका पैसा का खर्च झाला, हेच समजत नाही. बाबूश यांना स्मार्ट सिटीबाबत विचारल्यास ते त्रास काढल्याशिवाय इंद्रधनुष्य दिसत नाही, अशी कुठल्याकुठे विधाने करतात. एखादी इमारत पडली तर त्यांचे पुत्र तथा महापौर तेथे धावून जातात. स्मार्ट सिटीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ आपल्याला मिळाली नाही. मात्र पावसाळ्यानंतर त्यांची पुन्हा भेट घेण्याचा प्रयत्न करणार, असे पर्रीकर यांनी सांगितले.
कॅमेऱ्यालाच पोलिस संरक्षण द्या
स्मार्ट पणजीत २५० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यापैकी एक सीसीटीव्ही कॅमेरा चक्क एक कोटी रुपयांचा आहे, हे एकून धक्काच बसला. आता कॅमेरा इतका महाग असेल तर प्रत्येक कॅमेऱ्याच्या संरक्षणासाठी एक पोलिस तैनात करावा. इतके महाग कॅमेरे कुणी चोरले तर मोठे नुकसान होईल. त्यामुळे १ कोटीच्या कॅमेऱ्यांसाठी पोलिस संरक्षण हवेच, असे मागणीही पर्रीकर यांनी मिश्किलपणे केली.