एखाद्या ग्रामपंचायतीच्या राजकारणात मंत्री-आमदाराने किती सहभागी व्हावे याला काही मर्यादा असते. मात्र, ताळगावमध्ये ही मर्यादा कधीच राहत नाही. ताळगावच्या पंचायत निवडणुकीत महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांचा सहभाग हा दरवेळी प्रचंड असतो. त्यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीवेळी श्रीपाद नाईक यांचा जास्त प्रचार ताळगाव किंवा पणजीत केलेला नाही, पण पंचायत निवडणुकीचा प्रचार मात्र ताळगावमध्ये दिवसरात्र केला. ती पंचायत म्हणजे पीडीएसारखीच संस्था आहे. बांधकामांना परवाने देणे, ऑक्युपन्सी दाखले देणे ही कामे करण्यासाठीच त्या पंचायतीचा जणू जन्म झाला आहे. ताळगावच्या पंचायतीवर आपली कायम हुकूमत राहावी असा बाबूशचा प्रयत्न त्यासाठीच असतो.
ताळगाव पंचायत निवडणुकीत भाजप म्हणून कुठेच नव्हता. सबकुछ बाबूश मोन्सेरात होते. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात या काल निवडणूक निकालानंतरच लोकांना दिसल्या. निकाल सेलिब्रेट करण्यासाठी त्या घराबाहेर आल्या. फोटो काढून घेतले गेले. ताळगाव व पणजी विधानसभा मतदारसंघात बाबूश म्हणजे सबकुछ झालेले आहे. तिथे भाजप हा नावापुरता. मनोहर पर्रीकर यांच्या पुत्राला राजकीय वनवासाला पाठवून भाजपने मोन्सेरात यांना पूर्ण रान मोकळे करून दिले आहे.
ताळगाव पंचायत निवडणूक हा दर पाच वर्षांनी होणारा सोपस्कार असतो. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ बाबूशची सत्ता आहे, पण ताळगाव मतदारसंघात विकास किती झाला? केवळ एका बाजूने रस्ते प्रचंड रुंद केले गेले, चांगले फूटपाथ बांधले गेले, एक कम्युनिटी हॉल उभा केला गेला. मात्र, मतदारसंघातील बाकीचे सगळे रस्ते खड्डेमय आणि अरुंद आहेत. शेते बुजवून बिल्डरांनी मोठ्या इमारती उभ्या केल्या. ताळगावमध्ये आता मोकळ्या जागाच दिसत नाहीत. मग पावसाचे पाणी कुठे जिरणार? जे श्रीमंत, गर्भश्रीमंत आहेत, ते करंजाळेच्या बाजूने राहतात. त्यांच्यासाठी ताळगाव छान आहे. पण जे गरीब व मध्यमवर्गीय आहेत, त्यांना मूलभूत सुविधा नाहीत, वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय. नळाला पुरेसे पाणी येत नाही. लोक टँकर मागवतात. वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाय आपण काढावा, असे आमदार व मंत्र्याला वाटत नाही.
ताळगाव पंचायत निवडणुकीत मोन्सेरात यांचे जरी अकराही उमेदवार निवडून आले, तरी अनेक प्रभागात विरोधी मतेही वाढली आहेत. सिसील रॉड्रिग्ज हिने बाबूशविरुद्ध लढा देण्याचे धाडस तरी दाखवले. मंत्र्याच्या हातात सगळ्या यंत्रणा असतात, अशावेळी संघर्ष करणे, आपले उमेदवार उभे करणे हे धाडसच असते. एक महिला असूनदेखील सिसीलने बाबूशशी दोन हात करण्यासाठी रणांगणात उतरणे पसंत केले. टोनी रॉड्रीग्ज वगैरे पूर्वी जे काँग्रेसचे तिकीट घेऊन लढले, ते पंचायत निवडणुकीपासून दूर राहिले. शेवटी बाबूशच पंचायत आपल्या ताब्यात ठेवत असतो आणि पंचायत कोणताच मोठा विकास करत नाही. ताळगावला नीट बाजार प्रकल्प नाही. मासळी मार्केटची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. नीट बसथांबे किंवा निवारा शेड नाहीत. आपण याबाबत काही करावे असे पंचायतीला वाटत नाही. ग्रामसभांना देखील काहीवेळा मंत्री, आमदार उपस्थित राहतात. त्या उपस्थितीमागील हेतू वेगळा असतो.
पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया रविवारी झाली. त्यावेळी पूर्ण दिवस बाबूश मोन्सेरात त्या भागात फिरत राहिले, ते उपस्थित राहिले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहून वेगळेच वातावरण तयार केले, मोन्सेरात यांच्या गटाशी सिसील व तिच्या सहकाऱ्यांनी संघर्ष केला. एका वॉर्डमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. काही उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्याचे कौशल्य बाबूश दरवेळी दाखवतात. यावेळी चौघांना त्यांनी बिनविरोध विजयी केले. त्यांचीही छाती त्यावेळी ५६ इंच झाली असावी. गेल्या वीस वर्षांत ताळगावच्या कोणत्या सरपंचाने किती प्रमाणात विकासकामे केली याचा हिशेब बाबूशने द्यावा. जिथे मोठे बांधकाम प्रकल्प येतात, तिथेच तेवढे रस्ते रुंद केले आहेत. ताळगावच्या बाकी क्षेत्रात किंवा वाड्यांवर लोकांना मूलभूत सुविधादेखील नाहीत. शेतकरी बिचारे आपली शेती सांभाळण्यासाठी धडपडत आहेत. कायम हे असेच चालणार काय?