ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 12- अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात अटकेतील आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पोलीस कोठडीत गुरुवारी आणखी चार दिवसांनी वाढ करण्यात आली. त्यांची कोठडीतील चौकशी व्हावयाची असल्याचे पोलिसांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील गोपनीय माहिती माध्यमांना कशी मिळते याचे पुन्हा एकदा सविस्तर स्पष्टीकरण देण्याचा आदेश पणजी बाल न्यायालयाने दिला.
सतत तिसऱ्या वेळा बाबूश यांची कोठडी वाढवून देण्यात आली. मागील दोनवेळा तीन दिवसांची कोठडी दिली होती. या वेळी चार दिवसांनी कोठडी वाढवून देण्यात आला. सहसंशयित पीडितेच्या आईलाही चार दिवसांची कोठडी वाढविण्यात आली. पोलिसांच्या वकिलाकडून बाबूश यांना सात दिवसांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. बाबूश यांचे वकील सरेश लोटलीकर व राजीव दीक्षित यांनी कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. न्या. भारत देशपांडे यांनी बाबूश व पीडितेच्या आईला आणखी चार दिवसांची कोठडी दिली.
या प्रकरणातील गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांना कशी मिळते याचे पुन्हा एकदा सविस्तर स्पष्टीकरण देण्याचा आदेश पणजी बाल न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसून ते अपुरे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनीच हा अहवाल द्यावा, अशी सूचना न्यायालयाने क्राईम ब्रँचचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांना केली. तपासाची माहिती माध्यमांना पोलिसांकडून दिली नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले होते; परंतु त्यावर न्यायालयाचे समाधान झाले नाही.