पणजी - कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर गोवा सरकारच्या अबकारी खात्याने गोवा- कर्नाटकच्या सीमेवर गस्त वाढवली आहे. गोव्याहून जाणारी वाहने तपास नाक्यांवर तपासणे, त्यात प्रमाणाबाहेर दारू सापडल्यास ती वाहने ताब्यात घेणे, दारू जप्त करणे अशी कारवाई खात्याच्या अधिका-यांनी सुरू केली आहे. सत्तरी तालुक्यातील केरी येथील तपास नाक्यावर शुक्रवारी आठ लाखांची दारू अधिका:यांनी पकडली. ट्रक तिथेच टाकून चालक गायब झाला.
गोव्याहून दारू घेऊन कर्नाटकमध्ये जाताना जर वाहने आढळून आली तर ती वाहने थांबवली जातात. केरी तपास नाक्यावरून केए-25-बी-6449 क्रमांकाचा ट्रक गोव्याहून बेळगावच्या दिशेने जात होता. अबकारी खात्याच्या अधिका-यांनी या ट्रकला थांबण्याची सूचना केली. चढतीच्या ठिकाणी थोडय़ा अंतरावर चालकाने ट्रक पुढे नेला व ट्रक तिथेच उभा करून चालक पळून गेला. त्यानंतर 12 लाख रुपये किंमतीचा हा ट्रक अधिका-यांनी ताब्यात घेतला. तसेच 8 लाख 21 हजार 13० रुपये किमतीची ट्रकमधील दारू अबकारी खात्याने जप्त केली. गोल्डन एस व्हीस्की, हनी गिड ब्रँडी, हनी ब्लेण्ड प्युअर ब्रँडी अशी बरीच दारू ट्रकमधून पकडली गेली. अबकारी आयुक्त अमित सतेजा, सहाय्यक आयुक्त सत्यवान भिवशेट यांच्या मार्गदर्शनाखाली विबुती शेटी, अमोल हरवळकर, निलेश नाईक, अमृतराव राणो, निलेश गावडे, प्रसाद गावकर, अजरुन गावस, अभित नाईक यांनी ही कारवाई केली. चालक ट्रक सोडून पसार झाल्याने अधिका:यांचा संशय वाढला. कर्नाटकमध्ये निवडणुकीवेळी मतदारांना देण्यासाठीच ही दारू नेली जात होती, अशा प्रकारचा प्राथमिक संशय आहे. चौकशी काम सुरू असल्याचे एका अधिका:याने सांगितले.
काणकोण, मडगाव तसेच वास्को रेल्वे स्थानकाच्या हद्दीतही अबकारी खात्याने गस्त वाढवली आहे. तिथेही दारू पकडण्याची कारवाई सुरू आहे. विशेषत: वास्को रेल्वेच्या हद्दीत दारू पकडली गेली आहे. कर्नाटकमधील निवडणुका पार पडेर्पयत गोव्याचे अबकारी खाते कारवाई मोहीम सुरूच ठेवील, असे अधिका:यांनी स्पष्ट केले.