लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : निवडणुका जवळ येतात तेव्हा काँग्रेस, भाजप राज्यातील खाण व्यवसाय सुरु करण्याची आश्वासने देतात; परंतु ज्या खाण व्यवसायावर येथील बहुजन समाज अवलंबून होता तोच व्यवसाय बंद करून त्यांना उद्ध्वस्त केले, असा आरोप आरजीचे प्रमुख मनोज परब आणि सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी संयुक्तपणे केला. सोमवारी पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
परब म्हणाले, भाजप सरकारने २०११ साली राष्ट्रपतींना निवेदन सादर करत तत्कालीन मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांनी जवळपास २५ हजार कोटींचा खाण घोटाळा केल्याचा आरोप केला होता; परंतु आजपर्यंत कोणत्याच प्रकारची कार्यवाही त्यांच्यावर झाली नाही. मात्र, भाजपने ज्यांच्यावर गंभीर आरोप केले आज तेच नेते या पक्षात आले. भाजप, काँग्रेसने बहुजन समाजाची वाट लावली आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याआधीही सांगितले होते की, अशा घोटाळेबाजांना तुरुंगात पाठविले जाणार; परंतु असे कधीच घडले नाही. आज घोटाळेबाजांना या भाजप पक्षाने संरक्षण दिले; परंतु सामान्य गोवेकरांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले आहे, असेही ते म्हणाले.
आमदार वीरेश बोरकर म्हणाले, खाण व्यवसाय बंद पडल्यामुळे अडचणीत सापडलेल्या गावांना भेट देताना अनेक गोष्टी दृष्टीस पडत आहेत. गंजलेल्या अवस्थेत पडलेल्या अनेक गाड्या, बेरोजगार माणसे, बंद पडलेली दुकाने जागोजागी दिसतात. अत्यंत दयनीय अवस्था या खाण प्रभावित क्षेत्रांची आहे. याला भाजप सरकार जबाबदार आहे.