पणजी: ‘फाइंड मी इफ यू कॅन’ असे इन्स्टाग्रामवर खाते बनवून त्या खात्यावरून मुस्लिमांच्या भावना दुखावणारे पोस्ट टाकणारा साहील नाईक (२७) याला फोंडा प्रथम वर्ग न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
सोशल मिडियावर प्रेषित महम्मदला उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट करून राज्यात धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या साहीलला चार दिवसांपूर्वी पोलीसांनी पकडले होते. त्याच्या पोस्टमुळे मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावल्याच्या तक्रारी अनेक पोलीस स्थानकात दाखल करण्यात आल्या होत्या.
लोकांनी निदर्शनेही केली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्याला क्राईम ब्रँचने अटक करून फोंडा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. कोठडीतील चौकशीच्यावेळी संशयिताने आपला गुन्हाही कबूल केल्यामुळे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली गेली होती. त्याचा जामीन अर्ज मंजूर करताना फोंडा न्यायालयाने काही शर्ती ठेवल्या आहेत.
दहा हजार हमी रक्कम व तितक्याच रकमेचा हमीदार, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर न जाणे, अशाप्रकारचा गुन्हा न करणे, साक्षीदारांवर दबाव न टाकणे, चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य करणे, अशा अटी न्यायालयाने त्याच्यावर लादल्या आहेत.