मडगाव : गोव्यात गाजलेल्या बेताळभाटी गँगरेप प्रकरणातील एक संशयित राम भारिया हा अल्पवयीन असल्याचे सिध्द झाल्याने आता त्याच्याविरुध्दचा खटला बाल न्यायिक मंडळात हाताळण्यात येणार आहे. आज शुक्रवारी या गँगरेप प्रकरणाचा खटला दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्यान्यायालयात सुनावणीस आला. न्यायाधीक्ष विजया आंब्रे यांनी भारिया याच्या वयाची चाचणी घेतली असता तो गुन्हा झाला त्यावेळी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरुध्दचा खटला बाल न्यायिक मंडळात सुरु करावा, तसेच त्याला मेरशी येथे अपना घरात पाठवून दयावे व त्याच्याविरुध्द कोलवा पोलिसांनी नव्याने आरोपपत्र दाखल करावे असा आदेश दिले. आता भारिया याच्याविरुध्द खटला 21 मे रोजी सुनावणीस येणार आहे.
या गँगरेप प्रकरणातील अन्य एक संशयित संजीव पाल याच्याविरुध्दचा खटला दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु राहिल. या प्रकरणाची आता पुढील सुनावणी 29 मे रोजी होणार आहे. संशयिताचे वकील ए. व्हिएगस तसेच सरकारी वकील कृष्णा संझगिरी तसेच या गॅगरेप प्रकरणातील तपासअधिकारी पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता हे यावेळी न्यायालयात उपस्थित होते.
याप्रकरणी 24 मे 2018 रोजी गँग रेपची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी ईश्वर मकवाना, राम भरिया व संजीव पाल या तिघांना अटक केली होती. संशयित मूळ मध्यप्रदेश राज्यातील असून, पर्यटक म्हणून ते गोव्यात आले होते. यातील ईश्वर हा कुख्यात गुन्हेगार असून, मध्यप्रदेशात तो मॉस्ट वॉन्टेड आहे. त्याच्यावर सामुहिक बलातत्कार, खून व अन्य प्रकराचे गंभीर गुन्हे नोंद आहे. अटक केल्यानंतर मागच्या वर्षी 10 डिसेंबर रोजी पणजी येथील इस्पितळात उपचार घेत असताना, पोलिसांच्या हातावर तुरी देउन तो पळून गेला होता. अजूनही तो सापडू शकला नाही. फरार मकवाना याच्या गैरहजेरीत या बलात्कार प्रकरणाची सुनावणी घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
मकवाना फरार असल्याच्या पाश्र्वभूमीवर खबरदारी म्हणून अन्य दोन संशयितांना न्यायालयात आणताना हातात बेडया घालूनच आणले जात आहे. संशयितांना मोफत कायदा सेवा सवलतीखाली वकील पुरविण्यात आला आहे. 24 मे 2018 रोजी तिन्ही संशयितांनी बेताळभाटी येथे निर्जन बीचवर एका 20 वर्षीय युवतीवर बलात्कार केला होता. तिच्या मित्रलाही मारहाण केली होती. छायाचित्रे काढून ती व्हायरल करण्याची धमकी देताना खंडणी मागितली होती. मागाहून या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानतंर फातोर्डा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांना अटक केली होती.