- संदीप आडनाईक पणजी : बलुतं या लघुपटाला गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मिळालेला सन्मान अविस्मरणीय आहे, अशा शब्दात या लघुपटाचे दिग्दर्शक अजय कुरणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सायंकाळी मुख्य चित्रपटाआधी २६ मिनिटांचा बलंतु हा लघुपट दाखविण्यात आला. तत्पूर्वी या लघुपटाचे दिग्दर्शक अजय कुरणे, निर्माते निखिल चुरी आणि कविता चुरी, अभिनेत्री तनुजा कदम, आर्या कुरणे आणि संकलक अमित पाटील यांचा इफ्फीतर्फे सन्मानचिन्ह देउन सन्मान करण्यात आला. यावेळी कुरणे यांनी बलुतं ही व्यवस्था समजावून सांगितली. परंपरेने येणारा पुरुषप्रधान व्यवसाय करण्यास नाकारणाºया महिला नाभिक शांताबाई यादव यांनी कसा संघर्ष केला याबद्दल या लघुपटात प्रकाश टाकल्याचे कुरणे म्हणाले.लोकप्रिय अभिनेता स्वप्निल राजशेखर यांची पटकथा असलेल्या या लघुपटासाठी मंदार खरे यांनी पार्श्वसंगीत दिले आहे तर दिग्दर्शक अजय कुरणे यांनीच छायाचित्रण केले आहे. अजय खाडे यांनी निर्मिती व्यवस्था सांभाळली असून स्वप्निल पाटील कला दिग्दर्शक आहेत. उमेश बोळके, प्रमोद फडतरे, गिरिजा घोडे, नरेंद्र देसाई, हेमंत धनवडे या अन्य कलाकारांनी या लघुपटात काम केले आहे. इफ्फीमध्ये येण्याचे स्वप्न पूर्ण इफ्फीसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणे, हे माझे स्वप्न होते. माझ्या पहिल्याच लघुपटामुळे ते स्वप्न साकार झाले, यासारखा मोठा आनंद नाही. गोव्यात यापूर्वीही येउन गेलो, पण या निमित्ताने गोव्याच्या भूमीत स्वत:ची कलाकृती साकारताना पाहणे, हा वेगळा अनुभव होता, असेही कुरणे म्हणाले. बलुतंला मिळालेल्या प्रतिसादामुळे भारावून गेलो : निखिल चुरीबलुतं या लघुपटाला फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेला प्रतिसाद पाहून मी खूपच भारावून गेला आहे. या लघुपटाच्या कथेला लोकांनी खरोखरंच डोक्यावर घेतलेले आहे. त्यांच्या प्रतिसादाबद्दल मी खूपच समाधानी आहे.
'बलुतं'ला गोव्यात मिळालेला सन्मान अविस्मरणीय - अजय कुरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 10:54 PM