लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : युनायटेड बालरथ एम्प्लॉयी युनियनच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व बालरथ कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी आज, सोमवारपासून संपावर जाणार आहेत. एकूण ४२० बालरथ बसेसमधील ८४० कामगार संपात सहभागी होणार आहेत. त्याचा फटका बालरथमधून शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याची वेळ येऊ शकते.
दरम्यान, शिक्षण संचालनालयाने नोटीस जारी करुन बालरथ कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. बालरथ चालकांना प्रती महिना ११ हजार दिला जात होता तो आता १२ हजार केला आहे तसेच वाहकांना ५.५ हजार रुपये मिळत होते ते आता ६ हजार करण्यात आले आहे. संप करू नये असे आवाहन शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांनी केले आहे.
बालरथ कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाची नोटीस शिक्षण खाते व सर्व शाळांना दिली आहे. आम्ही कुठल्याच कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. मागण्यासांठी हा संप पुकारला आहे. याविषयी आम्ही सर्वांना पूर्वसूचनाही दिली आहे, असे कामगारांचे म्हणणे आहे.
मिळतो तुटपुंजा पगार
राज्यातील सरकारी अनुदानित शाळांमध्ये ४२० बालरथ बसेस कार्यरत आहेत. चालक आणि वाहक मिळून ८४० कामगार आहेत. सर्वांचा संपात सहभाग आहे. यापूर्वी अनेकदा कामगारांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला. पण, सरकारने त्यांना फक्त आश्वासने देऊन संप मागे घेण्यास भाग पाडले. बस चालकांना दरमहा फक्त ११ हजार रुपये, वाहकांना ५.५ हजार रुपये असा तुटपुंजा पगार मिळतो. पगार बँक खात्यात जमा न करता शाळांच्या व्यवस्थापनाकडे दिला जातो. व्यवस्थापनाकडून कामगारांची सतावणूक केली जाते. त्यांच्याकडून इतर कामे करून घेतली जातात, असे या कामगार संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले.
१ पगार वाढवला
दरम्यान, बालरथांसाठी शिक्षण खात्याकडून शाळांना वार्षिक ३ लाख ६६ हजार रुपये मिळत होते. ते आता ४ लाख १७ हजार केले आहेत. कामगारांना १० महिन्यांऐवजी ११ महिन्यांचा पगार मिळेल. अनुक्रमे १००० व ५०० रुपये पगारवाढ दिली आहे. वेळेवर पगार मिळेल. कामगारांच्या मागण्या काही प्रमाणात पूर्ण केल्या आहेत. कामगारांनी संप करू नये, असे आवाहन शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांनी केले आहे.
संप मागे घेणार नाही
शाळा व्यवस्थापनासाठी बालरथांसाठी वार्षिक रक्कम वाढवली. त्याचा चालक- वाहकांना काहीच फायदा होणार नाही. याचा फायदा शाळांनाच होईल. आम्हाला व्यावस्थापनाकडून पैसे नकोत. थेट कामगारांच्या खात्यात पगार जमा करावा. तुटपुंजी पगारवाढ नको. शाळा व्यावस्थापन कामगारांची सतावणूक करत आहे. त्यावर शिक्षण खात्याने स्पष्टीकरण द्यावे. नोटीस जारी करुन आम्ही संप मागे घेणार नाही. कायदेशीर मार्गाने चर्चा करून मागण्या मान्य कराव्यात. -स्वाती केरकर, कामगार संघटनेच्या नेत्या