मडगाव: माजी नगर नियोजन मंत्री आणि फातोर्ड्यांचे आमदार विजय सरदेसाई यांच्या कार्यालयाच्या बांधकाम बंद करण्याचा आदेश मडगावचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी मंगळवारी जारी केला असून, यासंबंधी 20 डिसेंबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे. सरदेसाई यांनी शेत जमिनीत बेकायदेशीररीत्या हे बांधकाम सुरू केल्याची तक्रार युनायटेड गोअन्स फाऊंडेशनचे डॉ. आशिष कामत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली होती. सरदेसाई सरकारात नगरनियोजन मंत्री असताना त्यांनी या बांधकामाला सुरुवात केली होती. मात्र नंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर या बांधकाम प्रकरणाने उचल खाल्ली आहे.दरम्यान, याच बांधकामासंदर्भात यापूर्वी एसजीपीडीएनेही कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचा निर्णय घेतला होता. यासंबंधी सरदेसाई यांना आज बुधवारी नोटीस पाठविण्यात येणार, अशी माहिती एसजीपीडीएचे सदस्य सचिव अशोककुमार यांनी दिली. सदर जमीन सरदेसाई यांच्या पत्नी उषा सरदेसाई यांच्या नावे असून उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी उषा सरदेसाईंच्या विरोधात मंगळवारी कारणे दाखवा नोटीस जारी केली. हे बांधकाम ताबडतोब बंद करावे आणि 20 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणा-या सुनावणीस आपल्या कार्यालयात हजर राहावे, असे या नोटिसीत म्हटले आहे.युनायटेड गोअन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. कामत यांनी यासंबंधी तक्रार देताना ज्या जमिनीत ही एकमजली इमारत उभी होते, ती जमीन कृषी विभागात येणारी असून मार्च 2019 मध्ये एसजीपीडीएने बेकायदेशीररीत्या त्याचे रुपांतर संस्थात्मक विभागात केले. या बांधकामासाठी एसजीपीडीएकडे सरदेसाई यांनी परवानगी मागताना जमीन रुपांतरणाची सनद जोडली नसल्याच्या बाबीकडे दुर्लक्ष करून एसजीपीडीएने या बांधकामास परवानगी दिली. यासंबंधी एसजीपीडीएकडे तक्रार करून ही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे कामत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
माजी नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाईंच्या बांधकामावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 7:00 PM