लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बाणस्तारी येथील अपघातात ६ वाहनांना ठोकणाऱ्या व तिघांचा जीव घेणाऱ्या मर्सिडीजमध्ये असलेल्या मेघना सिनाय सावर्डेकर हिची कोठडी म्हार्दोळ पोलिसांना हवी आहे की नको, या बाबतीत पोलिसच संभ्रमित अवस्थेत असल्याचे बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी दिसून आले आहे.
मेघना हिच्या अटकेची जोरदार मागणी करून लोकांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन पोलिसांवर दबाव आणल्यानंतर मेघना हिने फोंडा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून अंतरिम दिलासा मिळविला होता. यावर पोलिसांना आपले म्हणणे १६ ऑगस्ट रोजी मांडण्यास सांगण्यात आले होते; मात्र पोलिसांनी १६ रोजी आपली भूमिकाच स्पष्ट केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मेघनाला अटक करून तिची कोठडीत चौकशी करण्याची गरज आहे की नाही याचाही खुलासा केलेला नाही. या बाबतीत पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यास वेळ मागितला आहे. पुढील सुनावणी २३ ऑगस्ट रोजी होणार असून तोपर्यंत पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करून आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.
परेशला न्यायालयीन कोठडी; मेघनाला दिलासा
बाणस्तारी येथे ६ ऑगस्ट रोजी दारूच्या नशेत कार चालवून तीन लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या परेश न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर परेशची पत्नी मेघना सावर्डेकर याला मंगळवारी १४ दिवसांची सावर्डेकर हिला २३ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने दिलासा दिला आहे. आरोग्यविषयक कारणावरून न्यायालयाने मेघनाला १६ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते, ही मुदत बुधवारी संपली. बुधवारी अटकपूर्व जामिनावर पुन्हा युक्तिवाद झाला व तिला २३ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परेश सावर्डेकर याने दाखल केलेला जामीन अर्ज दोन्ही वेळेस फेटाळण्यात आला आहे. आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपल्या जामिनावर त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली असून त्याच्यावर आज, गुरुवारी सुनावणी होणार आहे.
ठळक नोंदी
- या प्रकरणात मेघनाची नोंद पोलिस डायरीत संशयित म्हणून नाही. गुन्हा परेश सावर्डेकरविरुद्ध नोंदविण्यात आला आहे.
- मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा चालकाशिवाय इतरांविरुद्ध नोंदविता येत नाही. तसेच एक वाहन एकावेळेस एकपेक्षा अधिक लोक चालवू शकत नाहीत.
- मेघना ही साक्षीदार असल्याची पोलिसांची मूळ भूमिका विचारात घेतली तरी साक्षीदाराला अटक करता येत नाही.
- तिला मुख्य संशयित म्हटले तर परेशला का अटक केली? असा प्रश्न उपस्थित होणार आहे.