ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १७ - चेतन देसाई, विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांनी स्वत: बँके त येऊन आपल्या समक्ष खाते खोलण्यासाठी बँकेच्या पेपर्सवर स्वाक्षऱ्या केल्याचा गौप्यस्फोट डीसीबी बँकेच्या व्यवस्थापकाने केल्यामुळे घोटाळेबाज त्रिकूट पूर्णपणे अडकले आहे. पोलिसांनी संशयितांची पोलीस कोठडी मागताना ही माहिती न्यायालयाला सादर केली. ज्या बँकेमध्ये संशयितांनी जीसीएचे अनधिकृत खाते खोलले होते, त्या डीसीबी बँकेच्या व्यवस्थापकानेच तिघांचे बुरखे फाडले असून तेच तिघे खाते खोलण्यासाठी बँकेमध्ये आले होते, असे पोलिसांना दिलेल्या जबाबात व्यवस्थापक ललिता काकोडकर यांनी म्हटले आहे. त्यांनी ही माहिती तारखेसह सविस्तर दिली आहे. डीसीबी बँकेमध्ये संयुक्त खाती खोलण्यासाठी काही सोपस्कार लागतात आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. खाते खोलणाऱ्या व्यक्तींना स्वाक्षरीसाठी स्वत: बँकेमध्ये यावे लागते असे त्यांनी सांगितले. बँक व संशयितांत झालेल्या इमेल व्यवहारांच्या पुराव्यासह माहिती पोलिसांना बँकेडून देण्यात आली आहे.