पणजी : सोमवार दि २२ रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालये व आस्थापनांसह आता बॅंकांनांही सुट्टी जाहीर झाली आहे.
या सोहळ्या निमित्त गोव्यात आधीच सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात सरकारी खाती आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. सर्वच बँका व इतर आस्थापनांना सुट्टी देण्यात आली आहे.आता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट खालीही ही सुट्टी जाहीर झाली आहे. त्यामुळे राज्यातील बॅंकाही सोमवारी बंद राहतील. सर्वसामान्य प्रशासन खात्याने तसा आदेश जारी केला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या दिवशी अर्ध्या दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. त्या दिवशी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत सरकारी कार्यालयांना सुट्टी राहणार आहे.
गोव्यासह अनेक राज्यातील सरकारांनी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. विशेष करून भाजप शाषित राज्यात असे आदेश जारी करण्यात आले आहेत. छत्तीसगड, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा त्यात समावेश आहे.