पणजी: पर्यटकांची लुट करणारे तसेच वेश्या व्यवसायाला थारा देणारे डान्सबार सील केले जातील अशी मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी कळंगूटमधील ११ डान्सबारना प्रशासनाकडून टाळे ठोकण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी, मामलेदार व पोलीस पथकांनी ही संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाईचा बडगा चालूच राहणार असून आणखी काही डान्सबार यंत्रणांच्या रडारवर आहेत. अनेक डान्सबारच्या विरोधात लोकांच्या तक्रारी आहेत. पोलीसांचे छापेही होऊ शकतात. तसेच गैरप्रकार चालत असल्याचे आढळून आलेल्या डान्सबारना टाळे ठोकले जाण्याची शक्यता आहे. एकदा टाळे ठोकले तर किमान ६ महिने तरी डान्सबार बंद राहणार आहेत. गंभीर स्वरूपाच्या उल्लंघनांसाठी कायमचाच परवाना रद्द करण्याची कारवाईही केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी म्हटले होते. त्याची प्रत्यक्ष सुरूवातही झाल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे.
नवीन वर्षाचा आरंभ लवकर येत आहे, तशातच ख्रीसमस सणही येऊन ठेपला आहे या पार्श्वभुमीवर गोव्यात देशी आणि विदेशी पर्यटकांचा फार मोठा ओघ सुरू होतो. मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. येत्या काही दिवसात आणखी पर्यटक येणार असल्याचे हॉटेल्स बुकिंगचे अवाल स्पष्ट करीत आहेत. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची काळजी घेण्यासाठी प्रशासानाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यात हिस्ट्रीशीटर आणि तुरुंगातून सुटलेल्या लोकांवर विशेष लक्ष ठेवण्याचाही समावेश आहे.