पणजी: भारतीय क्रिकेट नियमक मंडळाची (बीसीसीआय) ९२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा राज्यातील वागातोर येथील डब्लू गोवा या तारांकित हॉटेलमध्ये सोमवारी पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा पार पडली. दरम्यान राज्यात आंतरराष्ट्रीय क्रिक्रेट स्टेडीयम उभारण्याबाबत गोवा क्रिकेट संघटनेला (जीसीए) पूर्ण सहकार्य करु असे, ठोस आश्वासन यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिले आहे.
या बैठकी दरम्यान बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यासोबत अध्यक्ष रॉजर बिन्नी, जीसीएचे सचिव रोहन गावस देसाई, व इतर बीसीसीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.
गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे येथे एक स्टेडीयम व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. जीसीएने स्टेडीयमसाठी आवश्यक सर्व काही प्रक्रीया पूर्ण कराव्यात, बीसीसीआय त्यांना स्टेडियम उभारण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यावेळी दिली.
बीसीसीआयची वार्षीक सर्वसाधारण सभा गोव्यात झाली, त्या निमित्ताने येथे बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित झाले होते. यावेळी बीसीसीआयचे सचीव जय शहा, व अध्यक्ष रॉजर बिन्नी हेही उपस्थित होते. यांच्याकडे आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमचा विषय मांडला असून, त्यांनी याबाबत सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. आमच्याकडे स्टेडीयमबाबत जी प्रक्रीया पूर्ण करायची राहीली आहे, ती आम्ही लवकरात लवकर पूर्ण करु, असे यावेळी जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी सांगितले.
हे होते सभेतील महत्वाचे मुद्दे... - लोकपाल आणि आचार अधिकाऱ्यांची नियुक्ती- ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा समारोप.- नियम २६ आणि २५ मध्ये नमूद केल्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी), तसेच क्रिकेट समित्या, स्थायी समिती आणि पंच समितीवर बीसीसीआय प्रतिनिधींची नियुक्ती.- भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनच्या (आयसीए) एका प्रतिनिधीचा आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये समावेश करणे.- २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी खजिनदाराच्या अहवालाची स्वीकृती, तसेच २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक अंदाजपत्रक स्वीकारणे.
स्टेडियम उभारणीबाबतचा अधिकार फक्त जीसीए आणि सरकारकडे:
बीसीसीआयची वार्षिक आमसभा राज्यात झाली ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण आंतरराष्ट्रीय स्टेडीयमबाबत सर्व अधिकार आणि निर्णय जीसीए आणि राज्य सरकारच घेणार आहेत. बीसीसीआय स्टेडीयम उभारुन देऊ शकत नाही, ते फक्त आर्थिक मदत करु शकतात. आणि आर्थिक मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे जीसीएचे अध्यक्ष विपुल फडके यांनी सांगितले.
यापूर्वी देखील जीसीएने बीसीसीआयकडे स्टेडियमचा विषय मांडला होता, तेव्हा देखील त्यांनी संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन जीसीएला दिले होते, त्यामुळे यात काही नविन नाही. शेवटी निर्णय जीसीए आणि सरकारला घ्यायचा आहे. स्टेडीयमसाठी जागा निश्चित करणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रीया झाल्यावरच बीसीसीआय आर्थिक मदत करणार आहे, असेही फडके यांनी यांनी सांगितले.