ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 26 - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सीईओ राहुल जोहरी यांनी शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पाटो-पणजीतील कार्यालयात हजेरी लावली. तिथे त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तीन तास विविध प्रकारे चौकशी केली. त्यांना गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निधी अपहार प्रकरणी विविध प्रश्न विचारण्यात आले. क्रिकेट असोसिएशन (जीसीए) आणि बीसीसीआय यांच्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याच्या दृष्टिकोनातून ईडीने जोहरी यांना समन्स पाठवले होते. यापुढेही गरज भासल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
जीसीए निधी प्रकरणी यापूर्वी पोलिसांत गुन्हा नोंद झालेला आहे. सीईओ जोहरी यांच्याकडून विविध कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीवेळी सादर करण्यात आली. दोन कोटींपेक्षा जास्त निधीबाबतची कागदपत्रे सापडली नाहीत. जीसीएच्या निधी घोटाळ्याची व्याप्ती ही सहा कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, बनावट सह्या करून डिसी बॅँकेतून ३.१३ कोटींची अफरातफर करण्याच्या आरोपाखालीगोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांना आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. या घटनेमुळे गोव्याच्या क्रिकेट वर्तुळात मात्र प्रचंड हादरा बसला आहे. माजी रणजीपटू हेमंत आंगले यांनी सर्वाेच्च न्यायालयात कथित व्यवहाराप्रकरणी याचिका दाखल केली होती. क्रिकेटचे साहित्य खरेदी करण्यासाठी बनावट सह्या करून २६ लाख रुपयांची अफरातफर करण्याचा आरोपही देसाई, फडके यांच्यावर आहे. जीसीएतील हा घोटाळा जवळपास ६ कोटींचा असून ईडीच्या या चौकशीमुळे आता जीसीएतील अफरातफरी प्रकरणाला वेग येईल. असा विश्वास जीसीएच्या एका सदस्याने व्यक्त केला.