लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काही मतभेद असतील तर ते पक्षांतर्गतच आपापसात बोलून सोडवा, ते बाहेर न्याल व पक्षाचे नुकसान कराल तर यापुढे खपवून घेतले जाणार नाही. कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेस राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिला.
तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ठाकरे यांनाही कार्ल्स प्रकरणाबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की, आमदाराने पोलिसांत स्वतः तक्रार दिली आहे. त्याची चौकशी चालू आहे. तुम्ही याबद्दल पोलिसांनाच जाऊन विचारा. भाजपने याप्रकरणी आमच्या आमदाराची, तसेच पक्षाची बदनामी चालवल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. बैठकीत आगामी जिल्हा पंचायत निवडणूक, तसेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनेही चर्चा झाली. पक्षाच्या प्रभारी सचिव अंजली निंबाळकर म्हणाल्या की, गोव्यात पक्ष संघटना मजबूत करणे हे आता आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात माझे दौरे चालू आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी बाणावलीतून काँग्रेस उमेदवार देणार, असे माझ्या तोंडात पत्रकारांनी चुकीच वाक्य घातले. प्रत्यक्षात तेथील लोकांनी काँग्रेसने उमेदवार द्यावा, असा आग्रह धरला तेव्हा मी त्यांना तुमची मागणी पक्ष श्रेष्ठींना कळवतो एवढेच सांगितले.
पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, अ. भा. काँग्रेस समितीचे कायम सदस्य गिरीश चोडणकर हेही उपस्थित होते. दरम्यान, बैठकीत पक्षनेतृत्वाबद्दल, तसेच एकूणच पक्षात जे काही चालले आहे त्यावर तक्रारीचा सूर लावला असता ठाकरे यांनी त्यांना तुमचे जे काही मतभेद आहेत ते पक्षातच मिटवा, असे सांगितले.
पोलिसांना तपास करू द्या...
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव कार्ल्सप्रकरणी म्हणाले की, आमदाराने स्वतः तक्रार दिलेली आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. पोलिसांना तपास करू द्या. भाजपने विनाकारण कोणाची बदनामी करण्याचे कारण नाही. उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कोणत्याही नेत्याला बदनाम केले जाऊ शकते. त्यामुळे त्या नेत्याला किवा पक्षाला दोष द्यावा का, असा प्रश्न युरी यांनी केला.
भाजपनेच व्हिडीओ व्हायरल केला : ठाकरे
ठाकरे म्हणाले की, राज्यात नोकरीकांड, तसेच अन्य विषय गाजत असताना लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपनेच व्हिडीओ व्हायरल केला व आता पत्रकार परिषदा, मोर्चे आणून व्हिडीओचे प्रकरण गाजवले जात आहे; परंतु आमदाराने स्वतःच तक्रार दिलेली आहे. त्यामुळे पोलिसांना तपास तर करू द्या. चौकशीत काय ते स्पष्ट होईलच.
इंडिया युतीबाबत विधानसभा निवडणुकीआधी होणार निर्णय
इंडिया युतीच्या प्रश्नावर आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगश, तसेच पक्षाचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी केलेल्या विधानांबद्दल विचारले असता ठाकरे म्हणाले, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यावर निर्णय होईल. स्थानिक नेत्यांनी आता कोणतीही विधाने केली तरी त्याला मुळीच अर्थ नाही. सध्या आम्ही कोणाचे तोंड धरू शकत नाही. अखिल भारतीय काँग्रेस समिती पक्षाच्या भूमिकेबाबत अंतिम निर्णय घेईल. प्रत्येक पक्ष आपल्या हिताचे बोलत असतो. आघाडीच्या बाबतीत निवडणुका जवळ आल्यावरच अंतिम निर्णय होतील.