ऑनलाइन लोकमत/सदगुरू पाटील
पणजी, दि. 30 - गोव्यात येत्या जुलैपासून प्लास्टिक पिशव्यांची विक्री व खरेदी करताना जर कुणी आढळून आला तर पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. गोव्याचा तिसावा घटक राज्य दिवस मंगळवारी साजरा केला गेला. ईडीसीच्या एका उद्यानाचे पणजीत मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ""गोव्यात कुणीही रस्त्याच्या बाजूने प्लास्टिक पिशव्या फेकतात. शासकीय यंत्रणा महामार्गाच्या बाजूला असलेले प्लास्टिक जिथून उचलते तिथेच पुन्हा लोक प्लास्टिक टाकतात असाही अनुभव येतो. एरव्ही सरकारला दोष देत असलेल्या नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना येणे गरजेचे आहे. आम्ही महामार्गाच्या बाजूने कचरा गोळा करण्यासाठी वर्क स्टेशनही सुरू करू.""
मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या जुलैपासून प्लास्टिक पिशव्या खरेदी-विक्रीविरुद्ध पाच हजार रूपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. नागरिकांनी परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी. सिंगापूरमध्ये कचरा कुठेही फेकण्याचा गुन्हा करणारे नागरिक प्रचंड दंड भरतात व त्यामुळे तिथे रस्ते व परिसर सुरू आहे.