पणजी : गोव्यातील समुद्रकिनारे सध्या लोकांच्या भेटीसाठी बंद करण्यात आले आहेत. मात्र जे काही पर्यटक अजून गोव्यात आहेत, त्यांच्यापैकी काहीजण आणि काही स्थानिकही समुद्र किनाऱ्यांवर जाण्याचा प्रयत्न करतात. काहीजण तर जीवरक्षकांशी हुज्जतही घालत असल्याचे जीवरक्षकांच्या यंत्रणेला आढळून आले आहे.उत्तर व दक्षिण गोव्यात दृष्टी यंत्रणेचे जीवरक्षक अजून किनारपट्टी सांभाळत आहेत. कोरोना विषाणूमुळे समुद्रकिनारे लोकांसाठी बंद केले गेले आहेत. पण काही पर्यटकांना याची कल्पना नाही. गोव्यात नवे पर्यटक येत नाहीत. सीमा सिल केलेल्या आहेत. पण जे पर्यटक अगोदरच गोव्यात आहेत, ते अजुनही गोव्याच्या मोहमयी किनाऱ्यांचा आनंद लुटू पाहत आहेत. काही समुद्र स्नानाचाही आनंद लुटू पाहत आहेत. सोमवार व मंगळवारी दृष्टी यंत्रणेच्या जीवरक्षकांनी अशा काही लोकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. किनाऱ्यांवर येऊ नका असे जीवरक्षकांनी काही पर्यटकांना सांगून त्यांना परत पाठवले.मंगळवारी कळंगुट किनाऱ्यावर एक विदेशी पर्यटक आला. त्या महिला पर्यटकाने जीवरक्षकाशी हुज्जत घातली. किनाऱ्यांवर जाताच येणार नाही असे पर्यटकाला जीवरक्षकांनी सांगितले. यावेळी वाद घालून महिला पर्यटक माघारी वळली पण माघारी जाताना ती जीवरक्षकांच्या तोंडावर थुंकली असे दृष्टी यंत्रणेचे म्हणणे आहे.सध्या सुट्टी असली तरी, जीवरक्षक किनाऱ्यांवर असतील. देशी व विदेशी जे काही पर्यटक सध्या गोव्यात आहेत, त्यांनी व स्थानिकांनीही किनाऱ्यांवर येऊच नये, किनारे पूर्णत: लोकांसाठी बंद आहेत, असे दृष्टी यंत्रणोने जाहीर केले आहे. किनारे सोडून चला असा संदेश दृष्टीकडून दिला जात आहे. गोव्यात किनाऱ्यांपासून लोकांना व पर्यटकांना दूर ठेवण्याचा प्रकार हा कोरोनामुळे गेल्या पन्नास-साठ वर्षात प्रथमच घडत आहे.
गोव्याचे सागरकिनारे बंद; तरी जीवरक्षकांसोबत काहींची हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 6:50 PM