पणजी : परराज्यातून राज्यात विक्रीस आणल्या जाणा-या बीफची पशुसंवर्धनासाठी काम करणा-या बिगरसरकारी संस्थांकडून वारंवारच्या तपासणीविरोधात राज्यातील बीफ विक्रेत्यांनी शनिवारपासून (6 जानेवारी) दुकाने बंद ठेवून संपास सुरुवात केली. त्यामुळे राजधानी पणजीत काही विक्रेते दुकाने उघडून बसले असल्याने येणारा ग्राहक विचारून निघून जात आहे. दरम्यान, सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बीफ विक्रेत्यांची पणजीत बैठक होणार आहे, त्यात पुढील दिशा ठरविली जाईल.
राज्यात शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणावर बीफ विक्रीस येते. पशु संवर्धनासाठी काम करणा-या बिगर सरकारी संस्थांनी मध्यंतरी बेकायदेशीर बीफ विक्रीचे प्रकार जनतेसमोर आणले होते. त्यामुळे मागील महिन्यात शेवटच्या आवठड्यात पाच दिवस विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. वारंवार होणा-या तपासणीच्या घटनांमुळे विक्रेत्यांमध्ये असंतोष असून, सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे आणि अशा संस्थांचा त्रास थांबवावा, अशी मागणी केली आहे.
मांस विक्रेत्या संघटनांनेने हा मुद्दा उचलला असून, राज्यातील सर्व बीफ विक्री करणारी दुकाने शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी (5 जानेवारी) घेतला होता, त्यानुसार ही दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. शनिवारी दुपारी 4 वाजता संघटनेच्या बैठकीत विक्रेते पुढील दिशा ठरविणार आहेत. जर सरकारने यावर पाऊल उचलले नाहीतर दुकाने अजून काही दिवस बंद ठेवली जातील, असे येथील विक्रेत्याने ‘लोकमत’ला सांगितले