ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १२ - सुभाष वेलिंगकर यांना गोवा संघचालक पदावरून कमी केल्यानंतर नवीन संघचालक म्हणून नाना बेहरे यांच्यावर जबाबदारी देण्याचा निर्णय संघाच्या कोकण प्रांत कार्यकारणीने अनेक कारणांसाठी घेतला असला तरी सर्वमान्यता हे महत्त्वाचे कारण आहे. वेलिंगकर हेच संघचालक म्हणून बहुतांश स्वयंसेवकांना हवे असले तरी व्यक्तीमत्त्वच असे आहे की त्यांना कुणीही विरोध करणार नाहीत.
वेलिंगकर यांना पदावरून कमी केल्यानंतर लगेच गोवा संघाने कोंकण प्रांताशी फारकत घेऊन गोवा वेगळा प्रांत म्हणून जाहीर केला आणि वेलिंगकर हे गोवा प्रांताचे म्हणजेच गोवा प्रदेशाचे संघचालक म्हणून जाहीर करण्यात आले. एखाद् दुसरा अपवाद वगळता संघाची जुनी कार्यकारणीच गोवा प्रदेशाची कार्यकारणी म्हणून नव्याने नियुक्त करण्यात आली. त्यामुळे कोंकण प्रांताशी संलग्नता दाखविणारे संघाचे कार्यकर्ते गाठून त्यांना जबाबदारी देणे आणि त्यातही संघचालकांसारखी मोठी जबाबदारी देणे हे फार मोठे आव्हान कोंकण प्रांताकडे होते. कारण बहुतेक सर्व मोठे कार्यकर्ते हे वेलिंगकर यांच्या बरोबर आहेत. अशा परिस्थितीत संजय वालावलकर यांच्यासारख्यांवर संघचालक म्हणून जबाबदारी दिली तर ती आगीत तेल ओतण्यासारखे झाले असते. कारण वालावलकर हे संघाचे काम न करता भाजपचे काम करतात असा त्यांच्यावर ठपका आहे. एका रात्रीत भुमिका फिरविलेले रत्नाकर लेले यांच्यावर जबाबदारी देण्याची जोखीमही प्रांताला परवडणारी नव्हती. त्यामुळे अनेक संघाची थेट जबाबदारी नसलेले, परंतु गेली २४ वर्षे संघाच्या सेवा प्रकल्पाची जबाबदारी वाहणारे नाना बेहरे यांच्याशिवाय दुसरा पर्याय कोंकण प्रांताला मिळाला नाही.
बेहरे यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन करणारे फोन व संदेश स्वत: वेलिंगकर व त्यांच्या नेतृत्वाखालील संघ स्वयंसेवकांनीही केले. केंकण प्रांताला न जुमानणाºया स्वयंसेवकांनी केवळ बेहरे यांच्याशी असलेल्या संबंधामुळे, सेवा क्षेत्रांतील त्यांच्या कामामुळे व त्यांच्या शांत व्यक्तीमत्तवामुळेच हे अभिनंदन झाले.
नवीन संघचालक नियुक्तीनंतर प्रदेश संघ आणि गोवा विभाग संघ यांच्यातील संभाव्य दुहीची शक्यता बेहरे यांच्या नियुक्तीमुळे संपली आहे.
रविवारी वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कुजिरा येथील मेळाव्यात कोंकण प्रांताच्या निर्णयावर वक्त्यांनी टीका केली असली तरी बेहरे यांच्याविरुद्ध एकाही वक्त्याने एक अक्षरही बोलले नाहीत. शिवाय बेहरे यांच्या कन्या व जावई यांनीही या मेळाव्यात हजेरी लावली होती. बेहरे यांनी माद्यम आंदोलनासाठीही काम केले आहे. केवळ संघाचा आदेश मानून त्यांनी संघचालक पद स्वीकारल्याचे लोकमतशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोंकण प्रांतालाही आपली चूक कळून चुकली आहे. संघाच्या प्रमुख नेत्यांना तसे फोनही येत आहेत. माध्यम विषयीची वस्तुस्थितीही प्रांताला आणि केंद्राला भाजपकडून विपर्यास्त करून सांगण्यात आल्याचे संघाच्या क्षेत्रीय बौद्धीक प्रमुखांच्या लेखानंतर स्पष्ट झाले आहे. परंतु एकदा घेतलेला निर्णय घेणेही अडचणीचे होत असल्यामुळे आणखी ताणून न धरण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. शिवाय निवडणुकीनंतर गोव्यात दोन संघ राहणार नाहीत हे स्वत: वेलिंगकर यांनी स्पष्ट केल्यामुळे केंद्राच्या व प्रांताच्या दृष्टीने या बाबतीत फारसे लक्ष्य घालणेच इष्ट ठरणार आहे आणि नेमका हाच पवित्रा कोंकण प्रांताने आणि केंद्रानेही घेतल्याचे संकेत मिळत आहेत.