पणजी: गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या सरेंडीपीटी महोत्सवात धार्मिक भावना दुखविण्याच्या प्रकरणात कलाकारांचा सुरू असलेला तपास स्थगित ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दिला आहे.
सुमंत बालकृष्ण, अनिर्बन घोष,शिवा पाठक, निर्मला रविंद्रन अणि इतर पाच कलाकारांविरुद्ध धार्मिक भावना दुखविण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. हिंदु दैवतांची विडंबना करणारी गिते त्यांनी गायल्याची तक्रार पणजी पोलीस स्थानकात करण्यात आली होती. या प्रकरणात नंतर गुन्हा नोंदवून सर्व संशयितांना अटकही करण्यात आली होती. नंतर त्यांची जामीमवर सुटका करण्यात आली होती. या प्रकरणात पणजी पोलिसांकडून तपास सुरू होता. या प्रकरणात नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा व तपास थांबविण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका संशयितांकडन खंडपीठात सादर केली होती.
कलाकार हे गोव्याबाहेरील असल्यामुळे त्यांना वारंवार या तपासासाठी गोव्यात यावे लागते. तसेच त्यांनी कोणत्याही दैवताचे विडंबन केले नव्हते असा दावा त्यांच्या वकिलाने केला होता. ही याचिक दाखल करून घेऊन खंडपीठाने याचिकदारांना अंतरीम आदेश देऊन दिलासा दिला आहे. तूर्त या प्रकरणातील तपास स्थगीत राहणार असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.