साखळी : आपल्या पुढील पिढीला जे उत्तम आहे, ज्यातून स्वत:बरोबरच समाजाचा विकास साधता येतो, अशी साधने भेट देण्याचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम आहे़ त्यामुळे बालवयात मुलांना देण्यात येणारे शिक्षण चांगल्या पद्धतीने देणे गरजेचे आहे़ पालकांनीही आपल्या मर्जीनुसार मुलांच्या डोक्यावर शिक्षणाचे ओझे देऊ नये, त्यांच्या आवडी-निवडीचा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले़ गोमंतक बालशिक्षण परिषद, महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, राजभाषा संचालनालय आणि रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आनंददायी बालशिक्षण’ अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते़ व्यासपीठावर उपसभापती अनंत शेट, साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, राजभाषा संचालनालयाचे संचालक डॉ. प्रकाश वझरीकर, गोमंतक बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा दीक्षित, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्षा अलका बियाणी, रमेश पानसे, रामचंद्र गर्दे आणि मनोज सावईकर उपस्थित होते. या वेळी, उपसभापती अनंत शेट म्हणाले की, बालशिक्षण हे शास्त्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. परिणामकारकरित्या शिकविलेल्या शिक्षणाची फलश्रुती प्रत्येक विद्यार्थ्याला जीवनभर प्राप्त होत असते. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पालक हे पाल्याच्या शिक्षणाबरोबर आपल्या मनातील इच्छा पल्लवित करण्याचा प्रयत्न करतात. तसे न करता मुलाच्या आवडीप्रमाणे त्याला शिक्षण द्यायला हवे़ त्याचप्रमाणे तीच आपली कायम ठेव आहे, हे मानून त्यातच गुंतवणूक केल्यास या ठेवीचा फायदा वृद्धापकाळात मिळेल़ कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष रामचंद्र गर्दे यांनी स्वागत केले. सुरेखा दीक्षित यांनी दोन्ही परिषदेचा अहवाल सादर केला. या वेळी पूनम बुर्ये यांनी आपले अधिवेशन संबंधीचे मनोगत व्यक्त केले. रविवारच्या पहिल्या सत्रात अलका बियाणी यांनी निसर्गातील शिक्षण मुलांच्या मनातील भीती घालवून जिज्ञासा जागृत करते. विविध अनुभवांतून त्याचा आत्मविश्वास बळावतो. विविध कृतींतून अलगदपणे मुले शाळांच्या समीप जातात. खेडोपाड्यातील शाळांबरोबरच शहरातील विद्यालयांनीही निसर्गसानिध्यात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे सांगितले़ दुसऱ्या ‘अभिव्यक्तीचा आनंद’ या सत्रात केदार नाईक म्हणाले की, कला हा नैसर्गिक अविष्कार आहे़ मुले प्रतिभाशक्तीतून कलेची झेप घेत असतात. मात्र, ज्या वातावरणात मुले विकसित होत असतात त्याच वातावरणातील मुलांचे कल्पक आविष्कार समोर येतात. मुलांत ठासून भरलेल्या प्रतिभाशक्तीला वाट करून देण्याचे काम पालकांनी केले पाहीजे. ‘माझी शाळा’ या तिसऱ्या सत्रात दृकश्राव्य फितीच्या आधारे विविध शाळांतील शिकवणी मुलांच्या आवडीनिवडी निसर्गाकडे असलेली त्यांची ओढी यावर सविस्तर माहिती दाखविण्यात आली. ‘खुले अधिवेशन’ या चौथ्या सत्रात शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, अलका बियाणी, सुरेखा दीक्षित यांनी सहभाग घेतला, तर या सत्रात संध्या च्यारी, देशपांडे वैजयंती देवलापुरे, रामचंद्र देशमुख, अनुराधा गरुड, विनिता दंडारी, ज्योती जंजाळकर, कुष्टा मळीक, मोहन साखळकर, आदींनी बालशिक्षणविषयी आपल्या मनातील प्रश्न विचारून उत्तरे मिळविले. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन गौरी गर्दे यांनी केले, तर आभार मनोज सावईकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
सर्वाेत्तम शिक्षण हाच पर्याय
By admin | Published: November 03, 2014 1:08 AM