लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दिव्यांगांना मोफत उपकरणे देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. राज्यातील ३२ दिव्यांग व्यक्तींना हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने (एचपीसीएल) महारत्न उपक्रमांतर्गत व्हीलचेअर स्कूटर आणि संवाद साधने दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्कूटर व इतर गोष्टी प्रदान करण्यात आल्या. पर्वरी येथील विधानसभेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सभापती रमेश तवडकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत, आमदार दिव्या राणे, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव ई. वालवन, संचालक वर्षा नाईक, राज्य दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सचिव ताहा हाजिक, संजय स्कूलचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर व एचपीसीएलचे कार्यकारी संचालक राजीव गोयल व इतर अधिकारी उपस्थित होते. राज्य दिव्यांगजन आयोग कार्यालय व दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग यांच्या सहाय्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
दिव्यांगांना १० नियो मोशन बाईक्स, १० लोवर फ्लोर बाईक्स व १२ संवाद साधने देण्यात आली. आम्ही वर्षभरात विविध उपक्रम दिव्यांगांसाठी राबवले. पर्पल फेस्टमुळे आमच्या कार्याला गती मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील याची दखल घेतली आहे असे समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
पर्येतील दोघा दिव्यांगांना मिळाल्या खास दुचाक्या
सत्तरीतील दोन दिव्यांग व्यक्ती संदीप मळीक आणि अक्षता राणे या दोघांना स्थानिक आमदार डॉ. दिव्या राणेंच्या पुढाकाराने दोन खास दुचाक्या मिळाल्या. मुख्यमंत्री, मंत्री सुभाष फळदे- साईच्या उपस्थितीत विधानसभा संकुल आवारात याचे वाटप करण्यात आले.