पणजी : मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे गोव्याच्या कला व संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहाव्या लघुपट महोत्सवात नामवंत दिग्दर्शक पूजा कदम यांना ‘सर्वोत्तम महिला दिग्दर्शक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘द कॉलिंग’ या लघुपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांनी हा पुरस्कार पटकावला आहे.
पूजा कदम यांनी जवळपास एक दशकाहूनही अधिक काळ आपल्या दिग्दर्शन कौशल्याची मोहोर चित्रपटसृष्टीवर उमटविली आहे. बॉलिवूडमधील गाजलेल्या अनेक चित्रपटांमधून त्यांच्या कुशल दिग्दर्शनाची प्रचिती येते. ‘दिल धडकने दो’, ‘फुक्रे’, ‘रॉक ऑन २’ असे काही गाजलेले चित्रपटच नव्हे, तर ‘मिर्झापूर’, ‘मुंबई मेरी जान’ यांसारख्या तुफान लोकप्रिय ठरलेल्या वेब सीरीजच्या निर्मितीतही त्यांचा मोठा सहभाग आहे. दिग्दर्शन क्षेत्रातील पूजा कदम यांचा प्रवास म्हणजे कला क्षेत्रातील निष्ठा व बांधिलकीचा पुरावा आहे. ‘द कॉलिंग’ या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या लघुपटाने विदेशी लघुपटांच्या स्पर्धेतही आपले विविधांगी वेगळेपण सिद्ध केले असून त्यांच्या दिग्दर्शन कौशल्याने जागतिक स्तरावरील परीक्षक व प्रेक्षकांच्या पसंतीची कसोटीही पार केली आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील आशादायक वाटचालीच्या आश्वासक प्रवासाला बळ प्राप्त झाले आहे. या रोमांचक वाटचालीत उत्साहाची भर म्हणजे, ‘द कॉलिंग’ या लघुपटास इंग्लंडच्या खास स्पूकी हॅलोविन प्रदर्शातही स्क्रीनिंगचा सन्मान मिळणार असून, ही निवड म्हणजे पूजा कदम यांच्या दिग्दर्शन क्षेत्रातील प्रवासातील मैलाचा दगड ठरणार आहे. हॅलोविन उत्सवात सहभागी होणाऱ्या जागतिक प्रेक्षकांना ‘द कॉलिंग’ची मोहिनी पडणार आहे.‘द कॉलिंग’ या उत्कृष्ट लघुपटात सयानी गुप्ता व तृप्ती खामकर या प्रतिभावंत कलाकारांनी भूमिका वठविल्या असून हरीश कृष्णन यांच्या विशेष सिनेमॅटोग्राफीचा साज लाभला आहे. धर्मेंद्र बुर्जी हे या लघुपटाचे निर्माते आहेत.
हा लघुपट महोत्सव नुकताच गोव्यात झाला. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे हा उद्देश होता. या महोत्सवात विविध देशातील १०० हून अधिक लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले.