मडगाव : गोवेकरांसाठी खूशखबर! वार्षिक ट्रेव्हलर्स चॉईस पुरस्काराच्या आशियाई यादीत गोव्याच्या आगोंद बीचला पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. तीन किमीचा लांबच लांब रुपेरी वाळूचा पट्टा, काठावर असलेले आकर्षक शॉक्स याचबरोबर हा किनारा कासव संवर्धनाचेही केंद्र असल्याने जागतिक स्तरावरील पर्यटकांमध्ये हा किनारा आकर्षण बनला आहे.ट्रेव्हलर्स चॉईसच्या आशियाई यादीत एकूण पाच भारतीय किना-यांना स्थान मिळाले असून या यादीत चौथ्या स्थानावर अंदमान व निकोबार बेटावरील राधानगर बीचचे नाव आहे. गोव्यातील बाणावली, मांद्रे व पाळोळे हे समुद्रकिनारे अनुक्रमे 15, 18 व 20 व्या स्थानावर आहेत. ट्रेव्हलर्स चॉईस पुरस्कार ट्रीप अॅडव्हायजर या पर्यटन साईटवरील बुकिंग्सवर आधारित असतो. दक्षिण गोव्यातील अगदी टोकाचा तालुका असलेल्या काणकोणातील आगोंद बीच हा सौंदर्याने नटलेला किनारा असून, ट्रेव्हलर्स चॉईसच्या जागतिक यादीत पहिल्या पंचवीस किना-यांमध्ये त्याला स्थान मिळाले असून, या यादीत तो 18व्या स्थानावर आहे. भारतातील उत्कृष्ट पंचवीस किना-यांमध्ये आगोंदला पहिले स्थान प्राप्त झाले आहे. तुर्क आणि कायकोस येथील ग्रेस बे व प्रोव्हिडेन्शियल्स हे किनारे जागतिक यादीत पहिल्या स्थानावर असून या पाठोपाठ ब्राझीलचे बाय द सांचु व फेर्नादो द नोरोन्हा, क्युबाचा वाराडेरो बीच, अरुबाचा ईगल बीच व केमन बेटावरील सेव्हन माईल बीच यांचा क्रमांक लागतो.जागतिक स्तरावर भारतीय किना-यांची आता पर्यटक गंभीरतेने दखल घेऊ लागले आहेत. आशियात आगोंद किना-याला पहिले स्थान प्राप्त झाल्याने हे स्पष्ट झाले आहे. हा किनारा जागतिक यादीतही समाविष्ट आहे. भारतासाठी ही चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया ट्रीप अॅडव्हायजर इंडियाचे व्यवस्थापक निखिल गंजू यांनी व्यक्त केले यामुळे भारतात येणा-या पर्यटकांची संख्या वाढणार आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
गोव्यातील आगोंद किनारा आशियात सर्वोत्कृष्ट, जागतिक यादीत 18 व्या स्थानावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 5:22 PM