पणजी : पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या बिगर सरकारी संस्थेतर्फे लोकसंख्या, आरोग्य आणि विकास धोरणे यांच्या प्रभावी निर्मिती आणि अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे सातव्या जेआरडी टाटा मेमोरियल अवॉर्डसाठी ‘नॉन-हाय फोकस लार्ज स्टेट्स’ श्रेणीअंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून गोव्याची घोषणा केली.
याबाबत १८ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना आमंत्रित केले आहे. १९९६ मध्ये संस्थापक जेआरडी टाटा यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी, पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाने त्यांच्या नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतातील राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांनी केलेल्या प्रगती आणि प्रयत्नांना पुरस्कृत करण्यासाठी जेआरडी टाटा मेमोरियल अवॉर्ड्सची स्थापना केली होती. यंदा हा पुरस्कार गोव्याला जाहीर झाला आहे, असे फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका पूनम मुत्रेजा यांनी सांगितले.
गोव्याची ‘नॉन-हाय फोकस लार्ज स्टेट्स’ श्रेणीअंतर्गत सातव्या जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून निवड करताना खूप आनंद होत आहे. या पुरस्कारामध्ये गोव्यासाठी ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा समावेश आहे. पुरस्कार वितरण समारंभ दि. १८ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे दुपारी ३:३० ते सायंकाळी ५:१५ या वेळेत होणार आहे आणि त्यानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचे भाषण होईल, असे मुत्रेजा यांनी अधिक माहिती देताना सांगितले.
पुरस्काराची निवड प्रख्यात तांत्रिक सल्लागार समितीने शिफारस केलेल्या ४२ निर्देशकांच्या निर्देशांकावर आधारित आहे.