लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : पर्यटन खात्याने देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने पर्यटनस्थळ म्हणून जागतिक नकाशावर असलेला फर्मागुडी येथील महत्त्वाचा किल्ला ढासळू लागला आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याचा भिंतीचा भाग सोमवारी संध्याकाळी कोसळला. दोन वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी भिंत कोसळण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी संबंधित खात्याने त्याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु दुरुस्ती केली नसल्याने किल्ल्याचा शिल्लक राहिलेल्या भिंतीचा भाग कोसळला.
किल्ल्याची भिंत पडल्याचे वृत्त समजतात फोंडा परिसरातील शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करून सरकारने किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. फर्मागुडी येथील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला पर्यटकांना आकर्षित ठरत असतो. मंदिर पर्यटनाच्या निमित्ताने येथे येणारा देशी व विदेशी पर्यटक सर्वप्रथम सदर किल्ल्याला भेट देत असतो. मागच्या काही वर्षांपासून किल्ल्याच्या विविध भागात पडझड सुरूच होती. प्रत्येक वेळी यासंदर्भात शिवप्रेमी सरकारचे लक्ष वेधून घेत होते. गेल्या काही वर्षांपासून किल्ल्याच्या भिंती कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत, मात्र संबंधित खाते याकडे नेहमीप्रमाणे कानाडोळा करत आहे. कोसळलेल्या भिंतीची दुरुस्ती वेळोवेळी करण्यात येत नाही.
सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी मागच्या महिन्यात जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे किल्ल्याच्या भिंती कमकुवत झाल्या होत्या. त्यात मागच्या तीन दिवसात पावसाची रिपरिप पुन्हा सुरू झाल्याने सुकलेल्या भिंती परत ओल्या होऊन त्या खाली कोसळल्या. कोसळलेल्या भिंतीची दुरुस्ती करण्याची मागणी शिवप्रेमी करीत आहे. दरवर्षी शिवजयंतीवेळी तर मंत्र्यांकडून किल्ल्याची दुरुस्ती करण्याची आश्वासने दिली जातात; परंतु अजूनपर्यंत सौंदर्यीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.
सदर किल्ल्याच्या बाजूलाच महाविद्यालय असून, सदर महाविद्यालयातील विद्यार्थी येथे गप्पागोष्टी करण्यासाठी निरंतर उभे असतात. विद्यार्थी येथे उभे असताना त्या भिंतीचा भाग कोसळल्यास दुर्घटना घडू शकते. या किल्ल्याची दुरुस्ती करून पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तालुक्यात सध्या चार मंत्री असून, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मंत्र्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. येत्या शिवजयंतीपर्यंत या किल्ल्याच्या दुरुस्ती कामाची सुरुवात करावी, अशी मागणी शिवप्रेमी करीत आहे.
किल्ला पंचायतीच्या ताब्यात द्या : सरपंच
बांदोडाचे सरपंच सुखानंद कुरपासकर म्हणाले की, किल्ल्याच्या भिंती कोसळण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून होत आहे. देखभाल करण्यासाठी किल्ला स्थानिक पंचायतकडे देण्याची मागणी यापूर्वी पर्यटन खात्याकडे केली होती. परंतु त्यासंबंधी अजून सकारात्मक विचार केलेला दिसून येत नाही. सदर पंचायत आमच्या ताब्यात दिल्यास आणि त्याची योग्य ती निगा राखू, असे कुरपासरकर यांनी सांगितले.
सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याची आठवण फक्त शिवजयंतीच्या दिवसात येते. त्यानंतर किल्ल्याकडे दुर्लक्ष केले जाते. कित्येक वर्षांपासून शिवप्रेमींना सौंदर्यीकरण करण्याची आश्वासने दिली जातात. मंत्र्यांनी आश्वासने देण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ठोस कृती करून दाखविण्याची गरज आहे. - राजेश नाईक, माजी सरपंच, बांदोडा.