पणजी : गोव्यातील किनाऱ्यांना भेट देणा-या देश-विदेशी पर्यटकांसाठी समुद्र स्नान जीवघेणे ठरले आहे. चालू महिन्यात गेल्या पंधरा दिवसांच्या काळात ‘दृष्टि लाइफ सेविंग’च्या जीवरक्षकांनी तब्बल १४४ पर्यटकांचे प्राण वाचविले. कळंगुट, कांदोळी व हरमल किनारे याबाबतीत अतिसंवेदनशील ठरले आहेत.
आज सायंकाळी ५ च्या सुमारास हरमल किना-यावर ६४ वर्षीय रशियन पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, तो पट्टीचा पोहणारा होता परंतु आरोग्याच्या समस्येने त्रस्त होता. या महिलेने तेथील जीवरक्षकांना माहिती दिल्यानंतर जेटस्की मागविण्यात आली. तसेच १0८ रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली.
महिलेला गटांगळ्या खाताना वाचविण्यात आले. टॉवरपासून सुमारे ५0 मीटर अंतरावर या रशियन नागरिकांचे प्रेत तरंगताना आढळून आले. समुद्रात पोहताना त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा किंवा स्ट्रोक आला असावा, असा संशय पत्नीने व्यक्त केला आहे. पेडणे आरोग्य केंद्रात त्याला मृत घोषित करण्यात आले.
आज सकाळी अन्य एका घटनेत हरमल किना-यावर कर्नाटकच्या दोन पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. दरम्यान, पोहण्यास धोकादायक ठिकाणे दर्शविण्यासाठी आणखी ५0 नव्या जागी लाल बावटे लावण्याचे दृष्टि लाइफ सेविंग कंपनीने ठरविले आहे. हे बावटे लावलेल्या ठिकाणी पोहण्यास मनाई असेल. इंग्रजी आणि हिंदी भाषेत स्पष्ट इशारे लिहिलेले असतील. बागा, आश्वें-मांद्रे, मोरजी, हरमल भागात हे बावटे लावण्यात आले आहेत.