लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: धान्य कोटा सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी यापुढे रेशन दुकानदारांची राहील. ग्राहक हक्क संवर्धनासाठी लवकरच भरारी पथके तसेच ग्राहकांची गा-हाणी ऐकण्यासाठी उपसमिती स्थापन केली जाईल, असे नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी काल स्पष्ट केले.
राज्य ग्राहक संवर्धन मंडळाची पहिली बैठक नुकतीच मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नागरी पुरवठा खात्याचे सचिव आयएएस अधिकारी संजित रॉड्रिग्स, खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर, ग्राहक चळवळीतील संघटना 'गोवा कॅन'चे रोलंड मार्टिन्स व इतर याप्रसंगी उपस्थित होते.
रोलंड मार्टिन्स यांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले, लोकांना ग्राहक न्यायालयांमध्ये खटला सादर करताना ई-फायलिंगव्दारे सादर करावा लागतो. त्यात अडचणी येतात. त्यामुळे आता ई-फायलिंग कसे करावे, याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. ग्राहक न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही नवीन प्रकरणे कशी हाताळावीत याचे प्रशिक्षण देण्यात येईल. मोटर वाहन कायदा, अन्नसुरक्षा कायदा, ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड कायदा या कायद्यांमध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत. तसेच ग्राहक हक्क संरक्षण कायदा हा नवा आला आहे. या पाचही कायद्यांच्या बाबतीत जनजागृती केली जाईल.
आता पर्यटकांनाही तक्रार करता येणार
८ सप्टेंबर रोजी ग्राहक साक्षरता दिन पाळला जावा, अशी विनंती करण्यात आली. भरारी पथकांच्या बाबतीत रोलंड म्हणाले, अनेकदा पर्यटकांचीही फसवणूक होते. तक्रार कुठे करणार म्हणून ते गप्प बसतात. परंतु भरारी पथके स्थापन झाल्यानंतर पर्यटकही तक्रारी करु शकतील.