पणजी : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’चा कोणताही परिणाम गोव्यात जाणवला नाही. चतुर्थी काळात भाविकांची अडचण होऊ नये प्रदेश काँग्रेसने सोमवारी राज्यातील काही प्रमुख पेट्रोल पंपांवर निदर्शने करुन वाहनधारकांना पत्रके वाटली.
पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यावेळी उपस्थित होते. राजधानी शहरात फेरीधक्क्यासमोरील कंटक पेट्रोल पंपवर केलेल्या निदर्शनांमध्ये चेल्लाकुमार यांच्यासह आमदार जेनिफर मोन्सेरात, माजी महापौर सुरेंद्र फर्तादो, प्रवक्ते यतिश नायक, विजय पै आदीं सुमारे २0 जणांचा समावेश होता. कदंब बस स्थानकाजवळ असलेल्या हीरा पेट्रोल पंपवर सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस, जेनिफर मोन्सेरात यांच्यासह अंदाजे ४0 जणांचा समावेश होता.
चेल्लाकुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘चतुर्थी सणात लोकांना त्रास होऊ नये यासाठी गोव्यात केवळ निदर्शनांपुरते हे आंदोलन मर्यादित ठेवले. सरकारचा निषेध करणारी पत्रके वाटून आम्ही लोकांमध्ये प्रचंड दरवाढीबाबत जागृती केली. निवडणूक जाहिरनाम्यात भाजपने इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या कामी भाजप अपयश्ी ठरला. इंधन दरवाढ करुन सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जाते मात्र केंद्र आणि राज्य सरकार स्वत:ची तिजोरी मात्र भरते.’
चेल्लाकुमार म्हणाले की, ‘गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पेट्रोलवरील व्हॅट काढून टाकावा. तसे केल्यास १0 रुपये स्वस्त पेट्रोल मिळू शकेल. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी करावर सरकारने पाणी सोडावे कारण पेट्रोल, डिझेलचे दर आता जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.भारत बंद केवळ काँग्रेसने पुकारला असला तरी अन्य राजकीय पक्षांनीही त्याला समर्थन दिले आहे.’
चेल्लाकुमार यांनी असाही दावा केला की, केंद्रात संपुआ सरकार सत्तेवर होते तेव्हाही आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाचे दर वाढले होते. सरकारने तेव्हा याची झळ जनतेला पोहचू दिली नाही. २0१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर आल्यास इंधन दर कमी केले जातील, असे त्यांनी सांगितले.