लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मिरामार येथील समाधीस्थळाचा चेहरामोहरा बदलणार आहे. या समाधी स्थळाच्या नूतनीकरणास सुरुवात झाली असून, एका वर्षात ते पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मिरामार येथे भाऊसाहेब बांदोडकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित आयोजित शासकीय कार्यक्रमानंतर ते बोलत होते. त्यांच्यासमवेत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह भाऊसाहेबांचे कुटुंबीय व अधिकारी उपस्थित होते. बांदोडकरांच्या जयंतीनिमित सरकारकडून शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नूतनीकरणानंतर समाधीस्थळ हे लोकांसाठी खुले होईल. या समाधीच्या बाजूला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची समाधीही आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकर यांनी शिक्षण क्षेत्राला चालना दिली. राज्यातील शिक्षण क्षेत्रात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. गोव्यातील सरकारी शाळा ज्यांना दुरुस्तीची गरज आहे, त्यांची दुरुस्ती सरकारकडून हाती घेतली जाईल. पुढील एका वर्षात त्यांचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. एकही शाळा दुरुस्तीशिवाय राहणार नाही. गोवा सरकार शिक्षण क्षेत्राला नेहमीच चालना देत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारी शाळांचे भाग्य उजळणार
- भाऊसाहेबांनी गोव्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेला राज्याचा विकास पुढील वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनते- समोर मांडला जाणार आहे.
- भाऊसाहेबांनी शिक्षणाची गंगा राज्यातील गोरगरीब जनतेच्या घरापर्यंत पोहोचवली. सरकारी शाळा सुरु करून गोव्याच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या.
- त्यामुळे यंदाच्या वर्षात बिकट स्थितीत असलेल्या सर्वच सरकारी शाळांच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले जाईल, अशी हमीही त्यांनी दिली.
बांदोडकर स्मृती चषक फुटबॉल स्पर्धा घेणार
भाऊसाहेब फुटबॉलप्रेमी होते. त्यामुळे त्यांच्या ५० व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुढील तीन महिन्यांत भाऊसाहेब बांदोडकर स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार क्रीडा खाते, गोवा फुटबॉल goअसोसिएशन व गोवा फुटबॉल विकास महामंडळाचे सहकार्य घेणार आहे.