पणजी : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथील झालेल्या जातीय दंगलीचा गुरुवारी राज्यातील विविध दलित संघटनांनी राजधानी पणजीत निषेध केला. त्याचबरोबर या दंगलीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाळलेल्या मौनवृत्तावरही मान्यवरांनी जोरदार टीका केली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सायंकाळी भीमा-कोरेगाव येथील जातीय दंगलीचा निषेध करण्यासाठी विविध दलित संघटनांची सभा घेण्यात आली. त्याप्रसंगी हरिश्चंद्र जाधव, दादू मांद्रेकर, अनंत असोलकर, अॅड. अमरनाथ पणजीकर, तुळशीदास परवार, दिगंबर शिंगणापूरकर, मंगेश परवार यांची उपस्थिती होती.
मांद्रेकर यांनी भीमा-कोरेगाव येथील पेशवाईच्या काळात झालेल्या इंग्रजांबरोबरच्या लढाईचा इतिहास कथन केला. भिमा-कोरेगाव येथील घटना ही कटकारस्थान करून घडवलेली दंगल आहे. भीमा-कोरेगाव येथे आत्तार्पयत मागील वर्षात लाखो अनुयायी येऊन विजयस्तंभास अभिवादन करतात. भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक लढाईला दोनशे वर्षे पूर्ण होणार असल्याने लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. ही लोकांची उपस्थितीच काही घटकांना पहावी वाटली नाही. त्यातूनच तेथील दंगल घडवून आणण्यात आली. अजूनही देशात दलित वर्ग सुधारलेला नको वाटतो. शिवाय अजूनही या वर्गावर अन्याय सुरू आहे. येथील दंगलीविषयी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलत नाहीत. त्यांनी धारण केलेल्या मौनवृत्ताबद्दल संशय निर्माण होत आहे. याप्रसंगी विविध मान्यवरांची भाषणो झाली, त्याचबरोबर उपस्थितांनी भीमा-कोरेगावच्या घटनेच्या विरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, भीमा-कोरेगाव येथील दंगल घडविण्यामागील कोणती शक्ती काम करीत होती, ते समाजासमोर आले पाहिजे अशी मागणी करण्यात आली.