पणजी - पुढील वर्षाच्या सुरुवातील देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी गोव्यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे गोव्यातील लोकप्रिय नेते दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच उत्पल पर्रिकर हे लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी गोव्याचे तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या जागी प्रमोद सावंत यांची गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. दरम्यान, पर्रिकर यांचे पुत्र उत्पल हे पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे वृत्त होते. मात्र तेव्हा त्यांना उमेदवारी दिली गेली नव्हती. दरम्यान, आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून लढावे, अशी मागणी भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून होत होती. तसेच उत्पल पर्रिकरही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, अशी चर्चा आहे.
दरम्यान, २०१९ पासून उत्पल हे भाजपामध्ये नाराज असून, मनोहर पर्रिकर यांनी राजकारणामध्ये जो विश्वासाचा मार्ग स्थापन केला होता, तो १७ मार्च २०१९ मध्ये संपुष्टात आला, असे विधान उत्पल यांनी तेव्हा केले होते. आता उत्पल पर्रिकर हे काँग्रेसच्या वाटेवर असून, ते लवकरच राहुल गांधींची भेट घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर हे पुढच्या काळात कोणता राजकीय मार्ग निवडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.