लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात आरएसएसचे माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे वेलिंगकर व त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. दरम्यान, या निर्णयाविरोधात वेलिंगकर यांच्यावतीने उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.
वेलिंगकर यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सकाळीच युक्तिवाद संपले होते. न्यायालयाने निवाडा राखून ठेवला होता. रात्री नऊ वाजता निवाडा जाहीर करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश बॉस्को रॉबॉर्ट यांनी वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केल्याचे घोषित केले. त्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे अटकेची टांगती तलवार आहे
दरम्यान, अटकपूर्व जामिनाला विरोध करणारे ४ हस्तक्षेप अर्ज आले होते. त्यात आमदार क्रूझ सिल्वा, वॉरन आलेमाव, चर्चिल आलेमाव व झीना परेरा यांचा समावेश आहे. वेलिंगकर यांनी धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करून राज्यात जातीय तणाव निर्माण केल्याचा त्यांचा दावा होता. सरकारी वकिलांनी अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला आणि कोर्टाला सांगितले की, वेलिंगकर यांच्या कथित वक्तव्यामुळे राज्यात कायदा आणि सव्यवस्थेचा तणाव निर्माण झाला आणि डिचोली पोलिसांनी त्यांना बजावलेल्या दोन नोटिसांकडे त्यांनी दुर्लक्ष केले, असे वकिलांनी सांगितले.
तपासाला सहकार्य करण्याची सूचना
अटकपूर्व जामीन नाकारतानाच न्यायाधीशांनी वेलिंगकर यांना पोलिस तपासाला सहकार्य करण्यास सांगितले आहे. डिचोली पोलिसांच्या नोटिशीला अनुसरून हजर राहण्यास सांगितले आहे.
सत्याचा विजय झाल्याचा दावा
सुभाष वेलिंगकर यांना न्यायालयाने जामीन नाकारला, हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी व्यक्त केली. तशीच प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे प्रमुख अॅड. अमित पालेकर यांनीही व्यक्त केली. आता न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे वेलिंगकर यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
वेलिंगकर यांचा युक्तिवाद
वेलिंगकर यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की वेलिंगकर यांनी कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने ते वक्तव्य केले नव्हते तर सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या कथित अवशेषांची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी करावी ही केवळ सूचना होती. त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही. चौकशीला हजर न राहण्याच्या सरकारी पक्षाच्या युक्तिवादावर वेलिंगकर यांच्या वकिलांनी सांगितले की पोलिस लोकांच्या दबावाखाली काम करीत आहेत. त्यामुळे वेलिंगकर हे चौकशीसाठी गेल्यास त्यांना पोलिसांनी अटक केली असती. अटक न करण्याची शाश्वती मिळाली तर ते तपासाला सहकार्य करतील. वेलिंगकर यांच्यावतीने अॅड. सरेश लोटलीकर यांनी युक्तिवाद केला.
रात्री नऊ वाजता दिला निवाडा
या प्रकरणातील सुनावणी दुपारी १२.४५ वाजता पूर्ण झाली होती. न्यायालायने निवाडा संध्याकाळी ५ वाजता जाहीर करणार असे सांगितले होते. परंतु न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट हे निवाडा देण्यासाठी रात्री ९ वाजता आपल्या खोलीतून बाहेर आले आणि अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचे त्यांनी जाहीर केले.
पाशेको यांची कसून चौकशी
आरएसएसचे माजी गोवा प्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्याबद्दल माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांची सोमवारी कोलवा पोलिस स्थानकात कसून चौकशी करण्यात आली. पारोको यांनी येथे झालेल्या आंदोलनावेळी 'वेलिंगकर सापडल्यास त्यांच्यावर गोळी झाडू असे वक्तव्य केले होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लीच येथे झालेल्या आंदोलनावेळी सुभाष वेलिंगकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी पाशेको यांची काल दुपारी पोलिस स्थानकात चौकशी केली. सोशल मीडियावर हल्लीच व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाशेको हे आंदोलनाच्यावेळी वेलिंगकर तावडीत सापडल्यास गोळी घालू, असे वक्तव्य करताना दिसतात. पोलिसांनी व्हिडीओची दखल घेत कसून चौकशी केली. दरम्यान, चौकशीनंतर पारोको म्हणाले की, मी अजूनही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. एका व्यक्तीमुळे लोकांना त्रास का सहन करावा लागतो?' असा प्रश्न त्यांनी केला.