पणजी : गोवा प्रदेश भारतीय जनता पार्टीमध्ये मोठय़ा संघटनात्मक बदलांची प्रक्रिया सुरू झाली आहे. साडेतीन वर्षानंतर सतिश धोंड यांना पुन्हा भाजपाच्या गोव्यातील कामासाठी शुक्रवारी निुयक्त केले गेले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनाही यापुढे लवकरच बदलले जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. शनिवारी सायंकाळी तीन वाजता भाजपाची कोअर टीम, पक्षाच्या सर्व मोर्चाचे अध्यक्ष आणि दोन्ही जिल्ह्यांचे अध्यक्ष यांची एकत्रित बैठक होणार आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर हे या बैठकीत भाग घेतील.
यापूर्वी तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर आदींशी न पटल्यामुळे तसेच अन्य काही पक्षांतर्गत वादांमुळे धोंड यांची बदली गोव्याहून कोकण, ठाणे अशा भागांत भाजपाचे काम करण्यासाठी केली गेली होती. पार्सेकर त्यावेळी मुख्यमंत्री होते. भाजपाचे संघटनात्मक काम गोव्यात खिळखिळे झाले असल्याच्या तक्रारी अलिकडे पक्षाचे केंद्रीय नेते रामलाल, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, बी. एल. संतोष आदी नेत्यांकडे गेल्या. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी आहेत व पक्ष संघटनाही प्रबळ नाही, अशी स्थिती असल्याने गोव्यात लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी संघटनेची घडी नीट बसविण्याची गरज आहे. त्यामुळे धोंड यांना पुन्हा गोव्यात पाठविण्याचा निर्णय पक्षाने घेतला.
विजय पुराणिक हे महाराष्ट्रासह गोवा भाजपासाठीही संघटनमंत्री म्हणून काम करतात. धोंड हेही गोव्यासाठी संघटनमंत्री म्हणून काम पाहतील. त्यामुळे संघटनेत कोणतेही बदल करण्याचे अधिकार त्यांच्याकडे येतात. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बदलावेत असे ठरलेले नाही पण यापुढे तसा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा पक्षाच्या आतिल गोटात सुरू आहे. संघटनेला लोकसभा निवडणुकीपूर्वी बळ द्यावे अशी धोंड यांच्यावर जबाबदारी आहे.
पार्सेकर गट खूशमाजी मुख्यमंत्री पार्सेकर, माजी मंत्री मांद्रेकर आदींना धोंड हे गोव्यातील कामासाठी हवे होते. धोंड यांची नियुक्ती झाल्यानंतर पार्सेकर गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे, असे काही प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांनी लोकमतला सांगितले. तेंडुलकर व पार्सेकर यांचे पटत नाही. पार्सेकर हे यामुळे भाजपा कार्यालयात येत नव्हते. आज भाजपाच्या पणजीतील कार्यालयात पक्षाच्या कोअर टीमची व एकूण 35 प्रमुख पदाधिका-यांची बैठक होईल. त्यावेळी पार्सेकर हे प्रथमच बैठकीत सहभागी होतील. पुराणिक आणि धोंड हेही यावेळी उपस्थित असतील.