फोंडा : फोंडा शहरात ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहने जिकडे मिळेल तिकडे पार्क करून ठेवण्यात येत आहेत. परिणामी शहरात पार्किंगच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काही वाहने तर दिवसभर एकाच ठिकाणी पार्क करून ठेवण्यात येतात त्यामुळे बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या लोकांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही. यावर तोडगा म्हणून शहरामध्ये काही ठिकाणी पे पार्किंग योजना लागू करण्याचा ठराव फोंडा नगरपालिकेच्या बैठकीत घेण्यात आला .
हनुमान मंदिर ते दादा वैद्य चौक आणि तीस्क-फोंडा ते वरचा बाजार या रस्त्यांचे दुतर्फा प्राइम पे पार्किंग झोन म्हणून विचारात घेण्यात आले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली. ह्या संदर्भात अधिक माहिती देताना नगराध्यक्ष म्हणाले की, बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांच्या तक्रारी नगरपालिकेकडे येत होत्या. त्याच बरोबर वाहतूक खाते व पोलिसांपर्यंत सुद्धा लोक नाराजीचा सूर काढत होते. त्यासाठीच सर्व खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्या बरोबर नगरपालिकेने शहरातील विविध ठिकाणी पाहणी केली. संपूर्ण परिसराचे निरीक्षण केल्यानंतर तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार काही मोक्याच्या जागा ह्या पे पार्किंगसाठी ठेवण्यात येणार आहेत.
वाहन चालकांना शिस्त लागावी तसेच शहराला जे बकाल स्वरूप येत आहे ते टाळावे म्हणून काही ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात येईल. रिक्षा आणि पायलट स्टँडचे देखील लवकरच योग्यरित्या सीमांकन केले जाईल. शहरातील पे पार्किंग योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी, पोलिस, वाहतूक पोलिस, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आणखी एक बैठक घेण्यात येईल.