लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मोठ्या संख्येने झालेले मतदान भाजपच्या विरोधात असल्याचे दिसते. निवडणुकीत इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येत ते संसदेत खासदार म्हणून जातील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भाजप सरकार दरवेळी लोकांची फसवणूक करू शकत नाही. लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपला राग व्यक्त केला आहे. मतदान ७६ टक्के झाल्याने भाजप सुद्धा आश्चर्यचकीत झाला आहे. निकाल काँग्रेसच्या बाजूने लागणार हे ४ जून रोजी होणाऱ्या निकालावेळीच समजेल, असेही पाटकर यांनी सांगितले.
पाटकर म्हणाले, सासष्टीत यंदा १२ टक्के मतदान तर खाणग्रस्त भागात ७.३ टक्के मतदान वाढले आहे. लोकांनी यावेळी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे, हे यावरूनच स्पष्ट होते. दक्षिण गोव्याप्रमाणेच उत्तर गोव्यातील मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. जनतेने आपला निकाल दिला आहे.
लोकांनी एकूणच या मतदानाला चांगला प्रतिसाद दिला आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनीही निवडणुकीच्या प्रचारात मोठे सहकार्य केले आहे. दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष अॅड. अमित पालेकर म्हणाले, गोव्यातील अशा भागात मुख्यमंत्री कधीही गेले नव्हते, तेथे सुद्धा त्यांनी प्रचार केला. इंडिया आघाडीच्या भीतीनेच त्यांनी प्रचार केला.
निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे माहीत नाही, मात्र लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले. यावरून त्यांचा मतदान प्रक्रियेवर पूर्ण विश्वास असल्याचेच दिसते. पेडणे ते काणकोणपर्यंत इंडिया आघाडीने प्रचार केल्याचेही ते म्हणाले.