मडगाव: गोव्यातील व्यापारी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मडगावातील सर्वात मोठे व्यापारी संकुल म्हणून ज्याची ओळख आहे. त्या ओशिया कॉम्प्लेक्समधील एकाही दुकानाला सांडपाणी वाहिनीची जोडणी नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकल्पातील आस्थापनांचे सांडपाणी राजरोसपणे खुल्या गटारात सोडले जात असल्याचे उघड झाल्यानंतर मंगळवारी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी एकतर त्वरित सांडपाणी वाहिनीची जोडणी घ्या. अन्यथा या प्रकल्पातील वीज व पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला.यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी बुधवारी सकाळी सरदेसाई यांनी संबंधित अधिका-यांची बैठक बोलावली असून त्यात या प्रकल्पाच्या विकसकालाही बोलाविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, मडगाव नगरपालिका, नगर विकास व नियोजन प्राधिकरण तसेच सांडपाणी व्यवस्थापन अधिकारिणीच्या अधिका-यांशी यासंदर्भात चर्चा होणार आहे.मडगावात अगदी मध्यभागी असलेल्या आणि सर्वात मोठे व्यापारी संकुल असलेल्या या प्रकल्पात दोनशेपेक्षा अधिक व्यापारी आस्थापने असून या प्रकल्पाला सांडपाणी वाहिनीची जोडणी नसल्याने या सर्व दुकानांतील सांडपाणी जवळ असलेल्या खुल्या नाल्यात सोडत असल्याचे दिसून आल्यानंतर सरदेसाई यांनी मंगळवारी पहाणी केली. यावेळी मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक व अन्य अधिकारीही उपस्थित होते.घाण पाणी उघड्या नाल्यात सोडणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखे असून अशी मनमानी आम्ही चालवू देणार नाहीत असा सज्जड दम यावेळी सरदेसाई यांनी दिला. ते म्हणाले, या प्रकल्पाच्या विकसकाने सगळेच नियम धाब्यावर बसवले आहेत. मागची कित्येक वर्षे त्यांची मनमानी चालू आहे. मात्र यापुढे ती चालू देणार नाही. या प्रकल्पातील दुकानदारांना एका आठवड्याच्या आत सांडपाणी वाहिनीची जोडणी घ्यावीच लागेल. अन्यथा आरोग्य खात्याला कळवून या आस्थापनांतील पाण्याचा व वीजेचा पुरवठा बंद केला जाईल असे त्यांनी सांगितले.
पहाटे 2 वाजता पाण्याचा निचराया प्रकल्पातील आस्थापनांकडून दिवसभर सांडपाणी साठवून ठेवून पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सगळीकडे सामसूम झाल्याचा फायदा घेऊन हे सांडपाणी खुल्या गटारात सोडून देत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी मडगाव पालिकेकडून या प्रकल्पाच्या जवळ असलेले कोलवा सर्कल जवळील वाहतूक बेट काढून टाकण्याचे काम पहाटे 4 वाजेपर्यंत चालू होते. हे काम चालू असताना पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यांच्या लक्षात हा प्रकार आला. नाईक यांनी त्वरित यासंदर्भातील माहिती नगरनियोजन मंत्री सरदेसाई यांना दिली. त्यानंतर ही तपासणी झाली. पहाटेच्या दोनच्या सुमारास पंपिंगकरुन पाणी नाल्यात सोडले जाते असे लक्षात आले आहे. त्यामुळे एखादा झरा फुटावा त्याप्रमाणो हे सांडपाणी घसाघसा पहाटेच्या सुमारास नाल्यातून वाहत जात असल्याचे पालिका कर्मचा-यांच्या लक्षात आले होते.