लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: सोमवारी (दि.८) मध्यरात्रीनंतर बिर्ला, झुआरीनगर येथे लागलेल्या भयंकर आगीत पाच दुकानांची मोठी नुकसानी होण्याबरोबरच अन्य दोन दुचाकी जळून खाक झाल्या. आगीच्या याघटनेत दुकानातील सामान, दुचाकी व इतर सामग्री मिळून सुमारे ३६ लाख ६५ हजारांची नुकसानी झाली आहे. सुदैवाने याघटनेत कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहीती वेर्णा अग्निशामक दलाच्या अधिकाºयांकडून प्राप्त झाली.
वेर्णा अग्निशामक दलाचे अधिकारी दामोदर जांबावलीकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार रात्री १.४५ च्या सुमारास आग लागण्याची ही घटना घडली. बिर्ला परिसरातील पेट्रोल पंपच्या थोड्याच अंतरावर एकमेकांना टेकून असलेल्या दुकानात आग लागण्याची घटना घडली. याची माहीती मिळताच त्वरित प्रथम वेर्णा अग्निशामक दलाच्या जवानांनी बंबासहीत घटनास्थळावर धाव घेतली. येथे लागलेली आग भयंकर असल्याचे त्यांना दिसून येताच नंतर त्यांनी वास्को व ‘झुआरी एग्रो कॅमिकल्स’ च्या अग्निशामक दलांची मदत मागितली असता त्यांच्या जवानांनी बंबासहीत घटनास्थळावर पाचारण केले. बिर्ला परिसरात असलेले वृत्तपत्रे विकणारे दुकान, किराणा मालाचे दुकान, टायर दुरूस्ती दुकान, बार अॅण्ड रेस्टोरंण्ट व वायन स्टोअर अशा पाच दुकानात भयंकर आग लागल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांना दिसून येताच त्यांनी ही आग आटोक्यात आणण्याच्या कामाला सुरवात केली. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर (रात्री ३.४७ च्या सुमारास) जवानांना येथे लागलेली भयंकर आग आटोक्यात आणण्यास यश प्राप्त झाले.
याघटनेत त्या पाचही दुकानातील सामानाची व इतर सामग्रीची मोठी नुकसानी होण्याबरोबरच येथे उभ्या करून ठेवलेल्या ‘एवीयेटर’ व ‘स्प्लेंडर’ अशा दोन दुचाकी जळून खाक झाल्या. रात्रीच्या वेळी या दुकानात आग कशामुळे लागली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नसून त्याबाबत तपास चालू असल्याची माहीती दामोदर जांबावलीकर यांनी दिली. बिर्ला, झुआरीनगर येथे लागलेल्या आगीच्या या घटनेत सुमारे ३६ लाख ६५ हजार रुपयांची नुकसानी झाल्याची माहीती प्राप्त झाली.
अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणल्याने बाजूच्या परिसरात असलेल्या व्यवस्थापनांची सुमारे १८ लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यास त्यांना यश प्राप्त झाले. सुदैवाने याघटनेत कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याने येथे होणारा पुढचा अनर्थ टळला. या घटनेबाबत अधिक तपाच चालू आहे.