नेतृत्व काेणाकडे?, गोव्यात सरकारची स्थापना अडली; राज्यपालांकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 06:34 AM2022-03-19T06:34:50+5:302022-03-19T06:34:56+5:30
विधानसभेच्या चाळीसपैकी वीस जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.
- सद्गुरू पाटील
पणजी : बहुमत मिळूनही मुख्यमंत्री कोण बनावा याविषयी गोवा भाजपमध्ये वाद संपलेला नाही. केंद्रीय नेतृत्वाने अजूनही त्यावर तोडगा काढलेला नाही. त्यामुळे निकाल लागून सात दिवस झाले तरी गोव्यात सरकार स्थापनेचा दावा भाजपने केला नाही. परिणामी सगळीच प्रक्रिया अडली आहे. आता सगळे लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागले आहे.
विधानसभेच्या चाळीसपैकी वीस जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मगाेप आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे; मात्र मुख्यमंत्री कुणी व्हावे, भाजपचा विधिमंडळ गट नेता कोण असेल हे अजून ठरत नाही. आमदारांचा एक मोठा गट काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वासोबत आहे. काही आमदार विश्वजित राणे यांना पाठिंबा देत आहेत.
भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा नाही असा दावा काळजीवाहू मुख्यमंत्री सावंत यांनी केला. सावंत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिल्लीला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया दि. २१ नंतर सुरू करता येईल असे केंद्रीय नेतृत्वाने सावंत यांना सांगितल्याची माहिती मिळाली.
विराेधकांना चिंता
सरकार स्थापन होत नसल्याने विरोधी काँग्रेस पक्षाचे नेते दिगंबर कामत, मायकल लोबो, कार्लुस फरैरा यांनी काल शुक्रवारी चिंता व्यक्त केली. राज्यात यापूर्वी असे कधी घडलेले नाही. राज्याला अधांतरी ठेवणे हे राज्याच्या हिताचे नाही. राज्यपालांनी या विषयात हस्तक्षेप करण्याची गरज आहे असे लोबो व अन्य विरोधी आमदारांचे म्हणणे आहे.