पणजी : कदंब पठारावर पणजी- फोंडा बगल मार्गालगत भाजपचे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे भवन येणार असून यात प्रदेशाध्यक्षांसाठी केबिन, ६०० आसन क्षमतेचा हॉल, कॅन्टीन व रात्री निवासाचीही व्यवस्था असणार आहे. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
गोवा भेटीवर आलेले पक्षाचे प्रदेश लोकसभा निवडणूक प्रभारी आशिश सूद यांच्यासमोर या कार्यालयाविषयी सादरीकरण करण्यात आले. त्यांनाही कार्यालयाची संकल्पना आवडल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.
गुजरात तसेच अलीकडेच रायपूर, छत्तीसगडमध्ये भाजपने उभारलेल्या अद्ययावत व सुसज्ज कार्यालयाच्या धर्तीवर हे कार्यालय असेल. त्यासाठी कदंब पठारावर २९०० चौरस मीटर जागा संपादित केली असून इमारतीचे डिझाईन करण्याचे काम सध्या चालू आहे. गोव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी गुजरात येथे भेट देऊन तेथे भाजप कार्यालयामध्ये ज्या सुविधा आहेत त्याची पाहणी केलेली आहे. प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस यांच्यासाठी स्वतंत्र दालने, मोठा कॉन्फरन्स हॉल, कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासाठी सभागृह, व्हर्चुअल मीटिंग करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा या नवीन भाजप भवनमध्ये असेल. हे भवन शहराबाहेर येत असल्याने कॅन्टीन व्यवस्था आणि केंद्रातून येणाऱ्या नेत्यांची निवास व्यवस्था, अशी सज्जता येथे असणार आहे.
कदंब पठाराचा भाग पंचायत क्षेत्रात येत असल्याने ९ मीटर पर्यंत उंचीची इमारत बांधण्याची परवानगी आहे. तळमजला अधिक दोन मजले, अशी इमारतीची रचना ठरलेली आहे.